Vidhan Sabha 2019: काँग्रेस उमेदवाराच्या अर्जाला भाजप उमेदवाराचा आक्षेप; तरीही अर्ज वैध
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2019 05:22 AM2019-10-06T05:22:20+5:302019-10-06T05:23:30+5:30
वांद्रे पश्चिमचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार झकेरिया यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये व्यवसायासमोर ‘बिझनेस’ असा उल्लेख केला आहे.
मुंबई : वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून काँग्रसतर्फे अर्ज दाखल केलेल्या नगरसेवक आसिफ झकेरिया यांच्या उमेदवारी अर्जाबाबत भाजपचे उमेदवार शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी हरकत घेतली होती, मात्र रात्री उशीरा आसीफ झकेरिया यांचा अर्ज वैध ठरवला असल्याची माहिती निवडणूक कार्यालयातून देण्यात आली.
याबाबत दोघांना बाजू मांडण्यासाठी दुपारी वेळ देण्यात आली होती. निवडणूक अधिकाऱ्यांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्या; मात्र रात्री उशिरापर्यंत निर्णय जाहीर करण्यात आला नव्हता. रात्री उशीरा अर्ज वैध ट्हरल्याची माहिती वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी उमेश बिरारी यांच्या कार्यालयातून ही माहिती देण्यात आली.
वांद्रे पश्चिमचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार झकेरिया यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये व्यवसायासमोर ‘बिझनेस’ असा उल्लेख केला आहे़ मात्र त्याचे सखोल विवरण दिले नसल्याचा आक्षेप शेलार यांच्यातर्फे घेण्यात आला होता. रात्री उशिरापर्यंत अर्जाबाबत निर्णय झालेला नसल्याने काँग्रेस उमेदवार व कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते.
या मतदारसंघातील एमआयएमचे उमेदवार रफत फरहत हुसैन यांनी पक्षाचा ए-बी फॉर्म मुदतीत जोडला नसल्याने व त्यांच्या प्रतिज्ञापत्रात त्रुटी असल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला. तर, बहुजन समाज पक्षाचे
डमी उमेदवार म्हणून अर्ज भरलेल्या गणेश विश्वनाथ खैरे यांचा अर्जदेखील त्यातील त्रुटीमुळे फेटाळण्यात आला. त्यामुळे या मतदारसंघातील एमआयएमचे आव्हान लढतीपूर्वीच संपुष्टात आले आहे.