Vidhanparishad: शिवसेनेचा मध्यरात्रीच मोठा निर्णय, उद्धव ठाकरेंचा अशोक चव्हाणांना 1 वाजता फोन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 09:08 AM2022-06-20T09:08:20+5:302022-06-20T09:50:28+5:30

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रात्री उशिरा 1 वाजता काँग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांना फोन करुन अधिकची मतं काँग्रेसला देणार असल्याचं म्हटलंय

Vidhanparishad: Shiv Sena's big decision, Uddhav Thackeray's phone call to Ashok Chavan at midnight | Vidhanparishad: शिवसेनेचा मध्यरात्रीच मोठा निर्णय, उद्धव ठाकरेंचा अशोक चव्हाणांना 1 वाजता फोन

Vidhanparishad: शिवसेनेचा मध्यरात्रीच मोठा निर्णय, उद्धव ठाकरेंचा अशोक चव्हाणांना 1 वाजता फोन

googlenewsNext

मुंबई - विधान परिषदेच्या दहा जागांची निवडणूक आज सोमवारी होत असून दहावी जागा महाविकास आघाडीच्या खात्यात जाणार की राज्यसभा निवडणुकीप्रमाणे भाजप चमत्कार करणार याबाबत प्रचंड उत्कंठा लागली आहे. ‘शेरास सव्वाशेर मिळतोच’ असा इशारा मुख्यमंत्री ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना देत राज्यसभा निवडणुकीचा बदला घेणार असे जणू आव्हानच दिले आहे. तर, महाविकास आघाडीचा धर्म पाळत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसचे हात मजबूत केले आहेत. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रात्री उशिरा 1 वाजता काँग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांना फोन करुन अधिकची मतं काँग्रेसला देणार असल्याचं म्हटलंय. शिवसेनेकडे असलेली अधिकची 4 ते 5 मतं शिवसेना काँग्रेसला देणार आहे. शिवसेनेकडे एकूण 55 आमदार आहेत, तर विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेनच्या 2 उमेदवारांना प्रत्येकी 26 मतं आवश्यक आहेत. मात्र, त्या उमेदवारांना आवश्यक मतांपेक्षा 2 मतं जास्त देण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे. म्हणजेच 28 प्लस 28 एकूण 56 मतं शिवसेनेचे स्वत:च्या उमेदवारांना मिळणार आहेत. त्यात एक अपक्ष आमदाराचं मत असेल.  त्यामुळे, शिवसेनेकडे अपक्षांची अतिरिक्त असेलली मतं शिवसेना काँग्रेसला देणार आहे. शिवसेनेसोबत 7 अपक्ष आमदार आहेत, त्यांपैकी उर्वरीत मतं काँग्रेसला देण्यात येणार आहेत. 

सकाळपासूनच आमदारांची विधानभवनाकडे आगेकूच होताना दिसून येत आहे. पर्यंटनमंत्री आदित्य ठाकरे स्वत: एक बस घेऊन विधानभवनाकडे निघाले आहेत. तर, भाजप नेतेही बसमधूनच विधानभवनात पोहोचले आहेत. त्यामुळे, 1 उमेदवाराचा पराभव होणार आहे, तो आमदार कोण, असा प्रश्न सर्वांनाच पडला असून सायंकाळपर्यंत त्याचं उत्तर मिळेल. दरम्यान, मुख्यमंत्रीपद आणि सरकार टिकविण्यासाठी उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला मतं देण्याचा निर्णय घेतल्याची टिका भाजपकडून होत आहे. 

आषाढी वारीला सोमवारी सुरुवात होत आहे. विधान परिषदेच्या वारीत विजयाचा गुलाल कोण उधळणार याची उत्सुकता सर्वत्र आहे. रविवार असूनही राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आला होता. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण हे हॉटेलमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटले. सायंकाळी उशिरा मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री पवार, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण या आघाडीच्या नेत्यांनी फोनवरून चर्चा केली. दरम्यान, फोर सीझन हॉटेलमध्ये जाऊन शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी रात्री उशिरा काँग्रेसचे नेते व आमदारांशी चर्चा केली.

प्रसाद लाड विरुद्ध भाई जगताप सामना

- काँग्रेसला दुसरी जागेसाठी किमान ८ मते हवी आहेत. भाजपला स्वत:चे संख्याबळ व सोबतचे अपक्ष मिळून ११२ एवढे संख्याबळ असल्याने पाचवी जागा निवडून आणण्यासाठी तब्बल १८ मतांची गरज आहे. 
- लहान पक्ष, अपक्षांशिवाय आघाडीतील काही मते गुप्त मतदानाचा फायदा घेत फोडण्यावर भाजपचा भर आहे. भाजपमध्ये आमचे संबंध आहेत हे लक्षात ठेवा, असा इशारा देत राष्ट्रवादीने भाजपचीही काही मते फुटू शकतात असे सूचित केले आहे. भाजपचे प्रसाद लाड विरुद्ध काँग्रेसचे भाई जगताप असा दहाव्या जागेसाठीचा सामना आहे. भाजपचे आमदार संपर्कात असल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला तर उद्या काय ते दिसेलच असे भाजपचे  प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.
- राज्यसभा निवडणुकीच्या वेळी भाजपला पहिल्या पसंतीची १२३ मते मिळाली होती. त्यातील काही अपक्ष व लहान पक्षांचे आमदार यावेळी महाविकास आघाडीसोबत असल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे.

Web Title: Vidhanparishad: Shiv Sena's big decision, Uddhav Thackeray's phone call to Ashok Chavan at midnight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.