“समृद्धी अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांची तुटपुंजी मदत देऊन बोळवण”; वडेट्टीवारांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 03:07 PM2024-07-03T15:07:10+5:302024-07-03T15:07:43+5:30
Congress Vijay Wadettiwar News: तत्पर सरकार म्हणून मिरवणारे एक वर्ष उलटूनही मदत देत नसतील तर घोषणेला काय अर्थ, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
Congress Vijay Wadettiwar News: समृद्धी महामार्गावरील १ जुलै २०२३ रोजी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना शासनाने केलेल्या घोषणेतील प्रत्येकी २५ लाख रूपये मदतीपैकी केवळ ७ लाख रूपये मिळाले असून, उर्वरित मदत तातडीने देण्यात यावी, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
यासंदर्भात विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडला होता. याविषयी बोलताना ते म्हणाले की, १ जुलै २०२३ रोजी समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा जवळ रात्री दीड वाजेच्या सुमारास लक्झरी बस जळून २५ प्रवाशांचा मृत्यू होण्याची दुर्घटना घडली. १ जुलै २०२४ रोजी एक वर्ष पूर्ण झाले आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपये देण्याची शासनाने केलेली घोषणा फोल ठरली. मृतांच्या कुटुंबीयांची सीएम फंडातून केवळ ५ लाख रूपये आणि केंद्र सरकारकडून २ लाख रूपये मदत देऊन बोळवण करण्यात आली आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
दरम्यान, पुण्यातील पोर्शे कार घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाखांची मदत सरकारकडून तात्काळ करण्यात आली असताना ३६५ दिवस होऊनही समृद्धी महार्गावरील लक्झरी बस अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना मदत देण्यात टाळाटाळ होत आहे. मुख्यमंत्र्याचा शब्द अंतिम असतो तो पाळण्यात यावा. तत्पर सरकार म्हणून मिरवणारे एक वर्ष उलटूनही मदत देत नसतील तर घोषणेला काय अर्थ आहे, असा सवाल करत मृतांच्या कुटुंबियांना तातडीने उर्वरित मदत देण्यात यावी, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.