सांगली पोटनिवडणूकः पतंगरावांचे चिरंजीव विश्वजीत कदम यांना काँग्रेसची उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2018 05:57 PM2018-04-30T17:57:26+5:302018-04-30T18:12:26+5:30
विश्वजीत कदम हे डॉ. पतंगराव कदम यांचे चिरंजीव असून युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत.
मुंबईः राज्याचे माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या सांगली जिल्ह्यातील पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसनं विश्वजीत कदम यांना उमेदवारी दिली आहे. विश्वजीत हे डॉ. पतंगराव कदम यांचे चिरंजीव असून युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत.
पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. येथे 28 मे रोजी मतदान होणार असून, 31 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीमध्ये काँग्रेसने अपेक्षेप्रमाणे पतंगराव कदम यांचे सुपुत्र विश्वजित कदम यांना उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने या पोटनिवडणुकीत उमेदवार न उतरवण्याचा निर्णय घेत कदम यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. तर भाजपाने उमेदवार उतरवण्याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही.
विश्वजित कदम हे प्रथमच विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. याआधी त्यांनी 2014 च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत पुण्यातून निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना भाजपाच्या अनिल शिरोळे यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता.
सांगली जिल्ह्यातील पलूस-कडेगाव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व पतंगराव कदम करायचे. 9 मार्च 2018 रोजी त्यांचे निधन झाले. त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीची अधिसूचना 3 मे रोजी जारी होणार असून, 10 मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असेल.