राष्ट्रवादीसाठी विधिमंडळातील वाट बिकट; सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल ठरणार अडचणीचा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 08:15 AM2023-07-04T08:15:58+5:302023-07-04T08:17:01+5:30

राष्ट्रवादीसाठी विधिमंडळातील लढाईची वाट बिकटच दिसते आहे. 

Waiting for NCP in Legislature is tough; The verdict given by the Supreme Court will be problematic | राष्ट्रवादीसाठी विधिमंडळातील वाट बिकट; सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल ठरणार अडचणीचा

राष्ट्रवादीसाठी विधिमंडळातील वाट बिकट; सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल ठरणार अडचणीचा

googlenewsNext

-दीपक भातुसे 

मुंबई : अजित पवार नऊ जणांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्याविरोधात विधिमंडळात कायदेशीर लढाई लढण्याची तयारी केली आहे. मात्र, राष्ट्रवादीसाठी विधिमंडळातील लढाईची वाट बिकटच दिसते आहे. 

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी रात्रीच अजित पवार यांच्यासह शपथ घेतलेल्या नऊ जणांविरोधात विधानसभा अध्यक्षांकडे अपात्रतेची याचिका दाखल करीत त्यावर तातडीने निर्णय घेण्याची विनंतीही केली. मात्र, विधानसभा अध्यक्षांकडे यापूर्वीच्या आमदार अपात्रतेसंदर्भातील ३४ याचिका मागील वर्षभरापासून प्रलंबित आहेत. त्यात सुप्रीम कोर्टापर्यंत गेलेल्या १६ आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेचाही समावेश आहे.  

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर दुसऱ्या दिवशी २१ मे २०२२ रोजी ठाकरे गटाकडून शिंदे यांच्यासह १६ आमदारांविरोधात उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे अपात्रतेची याचिका दाखल केली होती. तेव्हा विधानसभेचे अध्यक्षपद रिक्त होते. अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची नियुक्ती झाल्यानंतर १६ आमदारांच्या अपात्रतेसह आणखी नवीन याचिका ठाकरे व शिंदे गटाकडून एकमेकांच्या विरोधात दाखल करण्यात आल्या. त्याही निकाली काढलेल्या नाहीत.

अपात्रतेसंदर्भात दाखल झालेली याचिका किती दिवसांत निकाली काढायची याची विधिमंडळाच्या नियमात स्पष्ट तरतूद नाही किंवा ती ठरावीक कालावधीत निकाली काढावी, असे बंधनही विधानसभा अध्यक्षांवर नाही. त्यामुळे राष्ट्रवादीकडून दाखल केलेल्या याचिकेवरही लवकर सुनावणी होण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे.   

‘तो’ निकाल ठरणार कळीचा मुद्दा  
ठाकरे विरुद्ध शिंदे गटाची याचिका निकाली काढताना सुप्रीम कोर्टाने दिलेला निकालही राष्ट्रवादीसाठी अडचणीचा ठरू शकतो. कोणत्या गटाला राजकीय पक्ष म्हणावे यासंदर्भातील निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा, असे या निकालात नमूद करण्यात आले आहे. जो गट राजकीय पक्ष म्हणू सिद्ध होईल त्या गटाला विधिमंडळ पक्षनेता आणि प्रतोद नियुक्तीचे अधिकार असणार आहेत. हीच बाब राष्ट्रवादीसाठी चिंतेची असल्याचे बोलले जात आहे. 

प्रतोदपदाची निवडही अवघड
राष्ट्रवादीकडून प्रतोदपदी जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती करण्याचे पत्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांना दिले आहे. मात्र, सध्या विधानसभेच्या रेकॉर्डप्रमाणे अनिल पाटील हे राष्ट्रवादीचे प्रतोद आहेत. तसेच राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्याचे कागदोपत्री अजूनही सिद्ध व्हायचे आहे. त्यामुळे आव्हाड यांच्या प्रतोदपदी नियुक्तीचा मार्गही अवघड मानला जात आहे.

माझ्याकडे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून काही अर्ज आलेले आहेत. जयंत पाटील यांनी रात्री दीड वाजता माझ्याकडे नऊ आमदारांविरोधात याचिका दाखल केली आहे. या सगळ्यांचा कायदेशीर अभ्यास केल्यानंतरच मी याबाबत निर्णय घेणार आहे. 
- राहुल नार्वेकर, विधानसभा अध्यक्ष  

Web Title: Waiting for NCP in Legislature is tough; The verdict given by the Supreme Court will be problematic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.