पक्ष कोणाचा याचा निर्णय मला घ्यायचाय, उपाध्यक्षांचा निर्णय बंधनकारक नाही!: राहुल नार्वेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 05:45 AM2023-10-27T05:45:43+5:302023-10-27T05:46:37+5:30
आमदार अपात्रतेवर जोरदार युक्तिवाद.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर गुरुवारी सुरू झालेली सुनावणी अखेर पक्ष (शिवसेना) कुणाचा या मुद्द्यावर येऊन ठेपली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर दोन्ही गटांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आले. शिंदे गटाने आणखी पुरावे सादर करण्यासाठी १४ दिवसांची मागणी केली. त्याला ठाकरे गटाने विरोध दर्शविला. उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिवसेनेच्या गटनेतेपदी अजय चौधरी यांची केलेली नियुक्ती न्यायालयाने वैध ठरविल्याचे सांगत पक्ष कोणाचा आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न ठाकरे गटाने केला.
त्यावर ‘उपाध्यक्षांचा तो निर्णय मला बांधिल नाही, न्यायालयाच्या निर्णयानुसार पक्ष कोणाचा हे मला ठरवायचे आहे आणि त्याचा निर्णय मी घेणार, असे नार्वेकर यांनी स्पष्ट केले. शिंदे गटाला पुरावे सादर करण्याची परवानगी मिळणार की नाही, हे २ नोव्हेंबरला होणाऱ्या सुनावणीत ठरेल.