'...तर पाकिस्तानात जा आणि तिथे राहा'; २६/११ हल्ल्यातील प्रत्यक्षदर्शीने वडेट्टीवारांना सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 11:06 AM2024-05-07T11:06:51+5:302024-05-07T11:12:23+5:30
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार माजी पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्या मृत्यूबाबत केलेल्या विधानाने राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे.
Vijay Wadettiwar : लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान, २६/११ दहशतवादी हल्ल्यातील आरोपी कसाबमुळे राज्यातलं वातावरण तापलं आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी माजी पोलीस अधिकार एस. एम. मुश्रीफ यांच्या पुस्तकाचा आधार घेते मुंबई उत्तर मध्यचे भाजपचे उमेदवार जेष्ठ वकील उज्ज्वल निकम यांच्यावर गंभीर आरोप केले. हेमंत करकरे यांना लागलेली गोळी कसाबच्या बंदुकीतील नव्हती. तर ती गोळी आरएसएस समर्थक एका पोलीस अधिकाऱ्याच्या बंदुकीतील होती. त्यावेळी हे पुरावे लपवणारा देशद्रोही कोण असेल तर तो उज्ज्वल निकम आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं होतं. आता या हल्ल्याशी संबधित एका साक्षीदाराने काँग्रेसला खडेबोल सुनावले आहेत.
२६/११ दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याच्याविरुद्ध साक्ष देणाऱ्या देविका रोटवान या प्रत्यक्षदर्शीने महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांच्या मृत्यूबाबतच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा उल्लेख टाळत देविकाने अशा पद्धतीने कोणीही ‘जखमेवर मीठ चोळू नये’, असे म्हटलं. दुसरीकडे उज्ज्वल निकम यांनीही आमच्याकडेही खूप महत्त्वाची माहिती आहे. वेळ आल्यावर सगळं बाहेर काढू, असं म्हटलं आहे. त्यामुळे या मुद्द्यावरुन राज्यातील वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.
"२६ नोव्हेंबरला कसाबने गोळी झाडली नाही तर कोणी ती चालवली? तो दहशतवादी हल्ला कोणीही विसरणार नाही. तुम्ही आमच्या जखमेवर मीठ चोळत आहात. राजकारण करायचे असेल तर इतर विषयांवर करा पण यावर नको. त्यांना (वडेट्टीवार) पाकिस्तानला पाठिंबा द्यायचा असेल तर ते भारतात काय करत आहेत? निकम यांच्यावरील आरोप खोटे आहेत. कारण त्यांनी देशासाठी खूप काही केले आणि कसाबला फाशी देण्यात मदत केली. ते मतदानाच्या वेळीच अशी विधाने करत आहेत," असे देविका म्हणाली.
"काँग्रेस नेत्याला या देशात राहण्याचा अधिकार नाही. निकम हे खोटं बोलले नाहीत किंवा त्यांनी देशाचा विश्वासघात केलेला नाही. कसाबचे गोडवे गायचे असतील तर पाकिस्तानात जा," असेही देविका म्हणाली.
दरम्यान, २६ नोव्हेंबर २००८ रोजी दहशतवादी हल्ला झाला तेव्हा देविका तिचे वडील नटवरलाल आणि भाऊ आकाशसोबत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथे ट्रेनची वाट पाहत होती.त्यावेळी कसाब आणि त्याच्या एका साथीदाराने स्टेशनवर अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये देविकाच्या उजव्या पायाला गोळी लागली होती. त्यानंतर कसाबच्या खटल्यादरम्यान कोर्टात साक्ष देणारी देविका ही सर्वात तरुण साक्षीदार ठरली होती.