आम्ही अजून विचार केलेला नाही, पण...; विरोधी पक्षनेतेपदाबाबत अजित पवार स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 02:12 PM2023-06-19T14:12:38+5:302023-06-19T14:18:33+5:30
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस दावा करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
मुंबई- शिवसेनेच्या वर्धापन दिनापूर्वीच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील आमदार मनिषा कायंदे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला. कायंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. यामुळे आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाची विधान परिषदेतील एक जागा कमी झाली आहे. आता यामुळे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदही शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाला सोडावे लागणार असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते पदासाठी राष्ट्रवादी दावा करणार असल्याची चर्चा आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, आम्ही अजुनही विधाव परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी विचार केलेला नाही. आम्ही आता या पदासाठी विचार करणार आहे. ज्यांच्या अधिक जागा असतात त्यांना विरोधी पक्षनेते पद असते, असं सूचक अजित पवार यांनी केलं आहे.
अजित पवार म्हणाले, मला बीग बी म्हटल्याबद्दल संजय रावतांचे धन्यवाद, मी महाविकास आघाडीबद्दल उद्धव ठाकरेंना विचारणार आहे. सध्याच्या परिस्थितीवर विचार करू. उन्हामुळे महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा पुढे ढकलण्यात आली आहे, असंही पवार म्हणाले.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षाच्या विस्तारासाठी प्रयत्न करत आहे. विशेषकरून गेल्या काही दिवसांपासून पूर्व महाराष्ट्रातील जिल्ह्यात हे प्रयत्न अधिक होताना दिसत आहेत. नांदेड जिल्ह्यात त्यांच्या सभाही झाल्या आहेत.
प्रत्येकाला पक्ष वाढविण्याचा अधिकार
यावर बोलताना अजित पवार म्हणाले, यापूर्वी मायावती, मलायमसिंह यादव यांनीही त्यांचे पक्ष वाढविण्याचे प्रयत्न केले आहेत. पण त्यांना त्यात यश म्हणावे असे यश मिळाले नव्हते. आता के. चंद्रशेखर राव यांना कदाचित देश पातळीवरील नेता व्हायचं असेल म्हणून त्यांचे प्रयत्न सुरू असतील. एका राज्याचे मुख्यमंत्री संभाळले म्हणजे त्यांना दुसऱ्या राज्यातही यश मिळेल असं म्हणता येत नाही. प्रत्येकाला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे.