शिंदे गटाएवढ्याच जागा आम्हाला मिळाव्यात; राष्ट्रवादीनं करुन दिली आठवण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 03:12 PM2024-03-06T15:12:01+5:302024-03-06T15:15:08+5:30

महायुतीच्या जागावाटपावर आज मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये चर्चा सुरू असून आजच जागावाटप निश्चित होणार असल्याचे समजते.

We should get the same number of seats in loksabha Election as the Shinde group; NCP Chhagan bhujbal reminded | शिंदे गटाएवढ्याच जागा आम्हाला मिळाव्यात; राष्ट्रवादीनं करुन दिली आठवण

शिंदे गटाएवढ्याच जागा आम्हाला मिळाव्यात; राष्ट्रवादीनं करुन दिली आठवण

मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपाने देशात १९५ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. मात्र, या यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे नाव नाही. त्यामुळे, महाराष्ट्रातील महायुतीच्या जागावाटपानंतरच भाजपाकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा होईल, असे दिसून येते. गृहमंत्री अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात मुंबईत शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत जागावाटपावर चर्चा केली. मात्र, अद्यापही तोडगा निघाला नाही. दुसरीडे महाविकास आघाडीचीही मॅरेथॉन बैठक सुरू आहे. त्यातच, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आम्हाला शिंदे गटाएवढ्या जागा मिळाव्यात असे म्हटले आहे.  

महायुतीच्या जागावाटपावर आज मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये चर्चा सुरू असून आजच जागावाटप निश्चित होणार असल्याचे समजते. अमित शाह यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा झाल्याचीही माहिती आहे. तर, दुसरीकडे भाजपाचे प्रमुख नेते आज दिल्लीत जाणार असून दिल्तीतच महाराष्ट्रातील उमेदवारांची नावे निश्चित केली जाणार आहेत. तसेच, महायुतीतील जागावाटपावर अंतिम निर्णयही तेथून होणार असल्याचे समजते. इकडे छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन, महायुतीत आम्हाला दिलेलं आश्वासन पाळलं जाईल, असे म्हणत जागावाटपावर भाष्य केलं आहे. 

महायुतीमध्ये आम्हाला दिलेलं आश्वासन पाळले जाईल, असा विश्वास आहे. त्यामुळे, शिंदे गटाला जेवढ्या जागा दिल्या जातील, तेवढ्याच जागा आम्हाला मिळाव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. तसेच, महायुतीत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष आहे. जागावाटपाबाबत कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं आहे, लवकरच जागावाटप होईल. त्यानंतर, उमेदवारांची घोषणा होईल, असेही भुजबळ यांनी सांगितले. कुठल्या मतदारसंघाची जागा कोणाला सुटेल, यापेक्षा त्या जागेवर कोणता उमेदवार निवडून येऊ शकतो, यास प्राधान्य राहणार असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले. 

महाविकास आघाडीत वंचितला सोबत घेण्याची चर्चा 

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असल्याने महायुती आणि महाविकास आघाडीकडून जागावाटपावर तोडगा काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. महाविकास आघाडीतप्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा समावेश करण्यात आला असला तरी अद्याप जागावाटपाचा तिढा कायम आहे. या पार्श्वभूमीवर आज मुंबईतील 'फोर सीझन हॉटेल'मध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर या नेत्यांमध्ये बैठक सुरू आहे. या बैठकीत मविआतील जागावाटपाचे मतभेद दूर करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती आहे.

Web Title: We should get the same number of seats in loksabha Election as the Shinde group; NCP Chhagan bhujbal reminded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.