"आपण आंदोलकांसोबत, दोषी पोलिसांवर कारवाई होईल"; अजित पवारांची स्पष्टोक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 09:13 PM2023-09-01T21:13:20+5:302023-09-01T21:26:45+5:30
जालना जिल्ह्यातील अंबड येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार, रबरी गोळ्यांचा आणि बळाचा गैरवापर झाल्याचे प्रथमदर्शनी दि
मुंबई - "मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही मागणी रास्त, न्याय्य मागणी आहे. या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंबड येथे किंवा राज्यात कुठेही होणाऱ्या शांततामय आंदोलनाला आमचा, राज्यातील नागरिकांचा पाठिंबा आहे. मराठा आरक्षणाचा लढा रस्त्यावर आणि न्यायालयातही तितक्याच ताकदीने लढण्याची आपली सगळ्यांची भूमिका आहे. त्यासाठी आपल्या सगळ्यांची एकजूट आणि सामूहिक प्रयत्न गरजेचे आहेत. यावरच आंदोलनाचे यश अवलंबून आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले.
जालना जिल्ह्यातील अंबड येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार, रबरी गोळ्यांचा आणि बळाचा गैरवापर झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. याप्रकरणी पोलिसांच्या भूमिकेची सखोल, निष्पक्ष चौकशी करण्यात येईल आणि दोषी पोलिसांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा विश्वास मी राज्यातील नागरिकांना देत असल्याचंही अजित पवार यांनी म्हटलं.
राज्यातील मराठा आंदोलनाने लोकशाही व्यवस्थेत शांततामय आंदोलनाचा आदर्श निर्माण केला आहे. हा आदर्श आणि गौरवशाली परंपरा कायम ठेऊन, कायदा सुव्यवस्था कायम राखत लोकशाही मार्गानेच हे आंदोलन पुढे जाईल, याची काळजी महाराष्ट्राच्या भल्यासाठी आपल्याला घ्यावी लागेल. राज्य शासन आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जण मराठा आंदोलकांच्या सोबत आहे. असा विश्वास देतो. अंबड येथील घटनेतील दोषी पोलिसांवर निश्चित कारवाई करण्यात येईल, कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही." अशी स्पष्ट भूमिका मांडत अजित पवार यांनी आपण मराठा आंदोलकांसोबत असल्याचे स्पष्ट केले आहे.
राज्यात परिस्थिती बिघडणार नाही
शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याची काळजी सर्वांनी घ्यावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा आंदोलक आणि राज्यातील नागरिकांना केले आहे.
मराठा समाज ही मारहाण विसणार नाही - वडेट्टीवार
जिल्ह्यातील सराटी अंतरवाली इथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू होते. त्यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केला, हा सरकारचा क्रूरपणा आहे. आधी फडणवीस सरकार असताना मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले. महायुती सरकार आल्यावरदेखील नुसत्या बैठका झाल्या, पण कारवाई झालीच नाही. मतांसाठी मराठा समाजाची फसवणूक या सरकारने केली, हे मराठा समाज विसरणार नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी केली.