भाजप काँग्रेसच्या सत्यजित तांबेंना पाठिंबा देणार?, चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 04:53 PM2023-01-12T16:53:54+5:302023-01-12T17:13:44+5:30
विधान परिषद पदवीधर नाशिक मतदारसंघात आता वेगळं समिकरण पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीमध्ये झालेल्या चर्चेनुसार या मतदारसंघाची जागा काँग्रेसला गेली, या जागेसाठी काँग्रेसने सुधीर तांबे यांच्या नावाची घोषणा केली.
मुंबई- विधान परिषद पदवीधर नाशिक मतदारसंघात आता वेगळं समिकरण पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीमध्ये झालेल्या चर्चेनुसार या मतदारसंघाची जागा काँग्रेसला गेली, या जागेसाठी काँग्रेसने सुधीर तांबे यांच्या नावाची घोषणा केली. पण, आज सुधीर तांबे यांनी अर्ज माघारी घेतला. त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबे यांनी आता अर्ज दाखल केला आहे, त्यामुळे या निवडणुकीत मोठा ट्विट पाहायला मिळत आहे. आता भाजप कोणाला उमेदवारी देणार या चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमिवर भाजप सत्यजित तांबे यांना पाठिंबा देऊ शकते अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नाशिक मतदारसंघात भाजपच्या दोन्ही कार्यकर्त्यांनी फॉर्म भरला आहे. त्यांना अजुनही एबी फॉर्म दिलेला नाही. आम्ही या मतदारसंघात राजेंद्र विखेंचे नाव सुचवले होते. भाजपने या निवडणुकीत कोणालाही एबी फॉर्म दिलेला नाही. जर या निवडणुकीत सत्यजित तांबे यांनी पाठिंबा मागितला तर आम्ही विचार करु, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
भाजपच्या दोन कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे, पण त्यांनी एबी फॉर्मची मागणी केलेली नाही. सत्यजित तांबे यांची उद्या काय भूमिका असेल ती आम्हाला माहिती नाही. या मतदारसंघात आम्ही कमी पडत आहोत. जनतेमध्ये आमची ताकद जास्त आहे. पण, आम्ही सहकारामध्ये कमी पडत आहोत, असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
काँग्रेसची उमेदवारी वडिलांना, पण अर्ज भरला मुलानं! सत्यजित तांबेंच्या उमेदवारीवरुन गोंधळ, आता...
आमच्या पार्लमेंट्री बोर्डात चर्चा करुन आम्ही त्यांना पाठिंबा द्यायचा की नाही हे ठरवणार आहे, आमच्यापर्यंत अजुनही कोणीही पाठिंबा मागितलेला नाही. पाठिंबा मागितला तर आम्ही विचार करु. ही निवडणूक आता अपक्ष उमेदवारांची आहे, असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
सत्यजित तांबेंच्या उमेदवारीवरुन गोंधळ
पक्षाकडून एबी फॉर्मवर डॉ. सुधीर तांबे यांनाच जारी करण्यात आल्यानं सत्यजित तांबे यांचा उमेदवारी अर्ज बाद होऊ शकतो. त्यामुळे खबरदारी म्हणून सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणूनही आणखी एक अर्ज दाखल केला आहे. "सत्यजित तांबे युवा उमेदवार असून त्यांना उमेदवारी मिळायला हवी अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये होती. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनाही याबाबतची कल्पना आहे. सत्यजित तांबे यांनाच उमेदवारी देण्याबाबत काँग्रेस नेत्यांचंही म्हणणं होतं पण काही तांत्रिक चुकीमुळे आणि संवादातील त्रुटीमुळे एबी फॉर्म वेळात पोहोचू शकलेला नाही", असं कारण डॉ. सुधीर तांबे यांनी यावेळी दिलं आहे.
आपणच काँग्रेसचे उमेदवार असल्याचा दावा सत्यजित तांबे यांनी केला आहे. तसंच या निवडणुकीसाठी सर्वपक्षीयांना पाठिंब्यासाठी विनंती करणार असल्याचंही ते म्हणाले. "काँग्रेस पक्षातील पक्ष श्रेष्ठींचीही मला उमेदवारी देण्याची इच्छा होती. पक्षानं मात्र निर्णय घेताना डॉ. सुधीर तांबे यांच्या नावाची घोषणा केली. तांत्रिक काही अडचणीमुळे शेवटच्या क्षणाला मला एबी फॉर्म मिळू शकलेला नाही. त्यामुळे मी दोन फॉर्म भरले आहेत. एक काँग्रेस पक्षाचा आणि एक अपक्ष उमेदवार म्हणून भरला आहे. माझ्या नावाचा एबी फॉर्म वेळेवर येऊ न शकल्यानं मला अपक्ष उमेदवार म्हणूनच निवडणूक लढवावी लागेल. परंतु मी उमेदवार काँग्रेस पक्षाचाच आहे. असं असलं तरी मी सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना भेटून पाठिंब्याची विनंती करणार आहे. राजकीय पक्षाच्या सीमेच्या पलिकडे जाऊन माझ्या पाठिशी उभं राहावं अशी माझी अपेक्षा आहे. मला सर्वांचा पाठिंबा मिळावा असा प्रयत्न करणार आहे", असं सत्यजित तांबे म्हणाले.