आम्ही लोकसभेच्या २३ जागा लढवणारच, राऊतांचा दावा; वडेट्टीवारांचं चोख प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 12:49 PM2023-12-22T12:49:44+5:302023-12-22T12:52:22+5:30

खासदार संजय राऊत यांनी जागावाटपाबद्दल आक्रमकपणे भूमिका मांडत आम्ही लोकसभेच्या २३ जागा लढवणार असल्याचं घोषित केलं आहे.

We will contest 23 Lok Sabha seats claims sanjay Raut congress vijay wadettivar reply | आम्ही लोकसभेच्या २३ जागा लढवणारच, राऊतांचा दावा; वडेट्टीवारांचं चोख प्रत्युत्तर

आम्ही लोकसभेच्या २३ जागा लढवणारच, राऊतांचा दावा; वडेट्टीवारांचं चोख प्रत्युत्तर

Lok Sabha Election Seat Sharing ( Marathi News ) : लोकसभा निवडणुका जवळ येऊ लागल्याने राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीतही जागावाटपावरून खलबतं होण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेस नेत्यांकडून जागावाटपाबाबत विविध दावे केले जात असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आक्रमकपणे भूमिका मांडत आम्ही लोकसभेच्या २३ जागा लढवणार असल्याचं घोषित केलं आहे. तसंच जागावाटपाची चर्चा राज्यातील काँग्रेस नेत्यांसोबत होणार नसून हायकमांडसोबत होईल, असंही राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केलं. 
 
राज्यातील काँग्रेस नेत्यांना फटकारत संजय राऊत म्हणाले की, "उद्धव ठाकरे जेव्हा दिल्लीत आले होते, तेव्हा आम्ही सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि के. सी. वेणुगोपाल यांच्यासोबत अर्धा तास महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीवर चर्चा केली. या चर्चेत काय घडलं हे फक्त आम्हालाच माहीत आहे. राज्यातील काँग्रेस नेत्यांना त्याबद्दल माहिती नसावी. लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील जागावाटपाची चर्चा महाराष्ट्र काँग्रेसमधील नेत्यांसोबत होणार नसून ती दिल्लीत होईल. आम्ही २३ जागा लढवणार आहोत, हे आम्ही दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्यांना स्पष्ट सांगितलं आहे. काँग्रेस हायकमांडसोबत आमचे संबंध अत्यंत मधूर आहोत," असं राऊत यांनी म्हटलं आहे.

वडेट्टीवार यांचं प्रत्युत्तर

संजय राऊत यांनी लोकसभेच्या जागावाटपावर भाष्य करताच काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पक्षाची भूमिका जाहीर केली आहे. "कोण किती जागा लढणार, हा वादाचा विषय होऊ शकत नाही. ज्याची जिथे ताकद आहे, तो पक्ष ती जागा लढवेल. हा निर्णय हायकमांडच घेणार आहे. जागावाटपासाठी अद्याप प्राथमिक चर्चेची फेरीही झालेली नाही. त्यामुळे संख्येचा प्रश्न आला कुठे? काहीतरी वावड्या उठवून आपसांत भांडण लावायचा हा विरोधकांचा प्रयत्न आहे," असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीची संयुक्त बैठक होण्याआधीच संजय राऊत यांनी आपला पक्ष किती जागा लढवणार हे जाहीर करून टाकल्याने महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. राऊत यांच्या या दाव्यावर काँग्रेसनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून काय प्रतिक्रिया दिली जाते, हे पाहावं लागेल.

Web Title: We will contest 23 Lok Sabha seats claims sanjay Raut congress vijay wadettivar reply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.