महाआघाडीत 'प्रकाश आंबेडकरांचं स्वागत तर संभाजी ब्रिगेडलाही सोबत घेऊ'
By राजा माने | Published: February 4, 2019 08:40 PM2019-02-04T20:40:01+5:302019-02-04T20:43:36+5:30
मी भुजबळ आणि राष्ट्रवादीची इतर मंडळी एकत्र येऊन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनाही भेटलो.
राजा माने
मुंबई - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत मनमोकळ्या गप्पा मारल्या. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागावाटपाबाबत तसेच आगामी लोकसभा निवडणुका आणि राजकीय परिस्थिती यावर त्यांनी आपली रोखठोक मते मांडली. देशातील राजकारण, मोदी सरकार, अर्थसंकल्प, आण्णा हजारेंच उपोषण, ठाकरे सिनेमा, आघाडी, आघाडीत मनसेला स्थान यांसह विविध विषयांवर काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. तर, प्रकाश आंबेडकरांनी आमच्यासोबत यावे, निश्चित वंचित बहुजन आघाडीला आमचं सन्मान योग्य जागा देऊ, असे चव्हाण यांनी स्पष्ट केलं.
प्रकाश आंबेडकरांनी सोबत यावं, स्वागतचं.
मी भुजबळ आणि राष्ट्रवादीची इतर मंडळी एकत्र येऊन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनाही भेटलो. त्यांना 12 जागा देणं शक्य नाही, पण आम्ही त्यांना योग्य जागा वाटप करू, असे मी प्रकाश आंबेडकरांशी बोललो. तसेच सीपीआय, सीपीएम, राजू शेट्टी, कवाडे यांची आरपीआय यांसारख्या 7-8 पक्षांशी आमची बोलणी झालेली आहे. त्यानुसार या आठवडाभरात अंतिम स्वरुप देण्याचा माझा प्रयत्न राहिल. संभाजी ब्रिगेडची काँग्रेसला पाठिंबा देण्याची मनापासून इच्छा आहे. आम्हीही त्यांना सोबत घेऊ, असे चव्हाण म्हणाले.
जागावाटप करताना समजा 8 जागा आम्ही इतर पक्षांना दिल्या, तर त्यापैकी 4 जागा राष्ट्रवादी देईल, 4 जागा आम्ही देऊ. त्यामुळे जागावाटपात घटक पक्षांना दोन्ही पक्षांकडून समान न्याय देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीला सन्माजनक जागा देण्याचा आमचा प्रयत्न राहिल. मतांच विभाजन टाळल गेल पाहिजे ही आमची भूमिका आहे. गेल्या निवडणुकीत ७० टक्के मते भाजप-सेनेच्या विरोधात राहिली आहेत. केवळ, ३० टक्के मतांवर भाजपा-सेनेचं सरकार उभारलंय. त्यामुळे सर्वच समविचारी पक्षांना आघाडीत घेण्याचा आमचा प्रयत्न असल्याचंही अशोक चव्हाण यांनी म्हटलं.