‘नो व्हेईकल डे’ साजरा करायला काय हरकत आहे?-हायकोर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 05:17 AM2018-02-01T05:17:23+5:302018-02-01T05:17:40+5:30
मुंबईत दिवसेंदिवस वाढत जाणारी वाहतूककोंडी पाहता, एक दिवस ‘नो व्हेईकल डे’ साजरा करण्यास काय हरकत आहे, अशी विचारणा करत, आठवड्यातील काही दिवस पादचाºयांसाठी म्हणून राखून ठेवा, अशी सूचना उच्च न्यायालयाने राज्य सरकारला बुधवारी केली.
मुंबई : मुंबईत दिवसेंदिवस वाढत जाणारी वाहतूककोंडी पाहता, एक दिवस ‘नो व्हेईकल डे’ साजरा करण्यास काय हरकत आहे, अशी विचारणा करत, आठवड्यातील काही दिवस पादचाºयांसाठी म्हणून राखून ठेवा, अशी सूचना उच्च न्यायालयाने राज्य सरकारला बुधवारी केली.
दक्षिण मुंबईतील काळबादेवी, भुलेश्वर, क्रॉफर्ड मार्केट, चिरा बजार इत्यादी ठिकाणील डबल पार्किंगच्या समस्येप्रकरणी, काळबादेवी येथील रहिवासी राजकुमार शुक्ला यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. यावरील बुधवारी झालेल्या सुनावणी दरम्यान, मुंबईतील मार्केटच्या ठिकाणी वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी काय उपाययोजना आखण्यात आल्या आहे, याची यादी सादर करा, असे निर्देश न्या. नरेश पाटील व न्या. एन. डब्ल्यू. सांब्रे यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला दिले.
या मार्केटच्या ठिकाणच्या गल्ल्या अतिशय अरुंद आहेत. त्यात गल्ल्यांच्या दोन्ही बाजूला बेकायदेशीरपणे पार्किंग करण्यात येते. त्यामुळे आपत्कालीन स्थितीत या ठिकाणी फायर इंजीन पोहोचणे कठीण आहे, असे याचिकेत म्हटले आहे. त्यावर वाहतूक विभागाने या ठिकाणी वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक हवालदार नियुक्त करण्यात आल्याची माहिती न्यायालयाला दिली.
‘वाहने हलवायलाही जागा नसेल, तर वाहतूक हवालदार काय करणार आहे? वाहतूक हवालदार नेमून काम होणार नाही. तुम्हाला काहीतरी नवीन उपाय शोधावा लागेल. मार्केटच्या ठिकाणी पार्किंगसाठी पुरेशी जागा उपलब्ध करा. अंडरग्राउंड
किंवा बहुमजली पार्किंग सुविधा उपलब्ध करण्याचा काही विचार
आहे का?’ अशी विचारणा न्यायालयाने सरकारकडे केली, तसेही वाहतूक हवालदार मोबाइलवर बोलण्यात किंवा खेळण्यात मग्न असतात, अशा शब्दांत न्यायालयाने फटकारले.