"दादा इज ग्रेट"; अजित पवारांनी चुकीबाबत कबुली दिल्यानंतर तटकरे नक्की काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 06:55 PM2024-08-13T18:55:05+5:302024-08-13T19:31:03+5:30
आम्ही पुढेही एनडीएच्याच माध्यमातून काम करणार आहोत, असा खुलासा सुनील तटकरे यांनी केला आहे.
NCP Sunil Tatkare ( Marathi News ) : राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत चूक झाल्याची कबुली दिल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. अजित पवारांच्या या कबुलीवर विविध नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात असताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही आपली भूमिका मांडली आहे. निवडणुकीच्या निमित्ताने जे अनुभव आले असतील त्यावरून अजितदादांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, असं तटकरे यांनी म्हटलं आहे.
अजित पवारांच्या वक्तव्यावर पुढे बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, "अजितदादा आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांनी त्यांची भावना अनौपचारिक गप्पांमध्ये वगैरे व्यक्त केलेली नसून एका मुलाखतीत व्यक्त केली आहे. दादा हे दादा आहेत, दादा इज ग्रेट. हे आम्ही आगामी काळात सिद्ध करू. अजितदादांनी बारामती लोकसभेबाबत जी भूमिका मांडली आहे त्याबद्दल ते आगामी काळात आणखी विस्ताराने बोलतील. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एनडीएमध्ये सामील होण्याचा जो निर्णय घेतला आहे तो अत्यंत विचारपूर्वक घेतला असून आम्ही पुढेही एनडीएच्याच माध्यमातून काम करणार आहोत," असा खुलासा तटकरे यांनी केला आहे.
चूक मान्य करताना अजित पवारांनी नक्की काय म्हटलंय?
"बारामतीत कोणी लाडकी बहीण आहे का तुमची?" असा प्रश्न एका मराठी वृत्तवाहिनीवरील मुलाखतीदरम्यान अजित पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना ते म्हणाले की, "सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत. राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी आहे, मात्र सर्वच बहिणी माझ्या लाडक्या आहेत. अनेक घरांमध्ये राजकारण चालतं. पण राजकारण हे घरामध्ये शिरून द्यायचं नसतं. लोकसभेला मात्र माझ्याकडून चूक झाली. मी माझ्या बहिणीविरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं. तेव्हा पार्लामेंट्री बोर्डाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला गेला. आता एकदा बाण सुटल्यावर माघारी घेता येत नाही. परंतु आज माझं मन मला सांगतं तसं व्हायला नको होतं," असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं होतं.