तुमच्या पक्षाचं भविष्य काय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना सवाल?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 09:41 PM2018-10-23T21:41:29+5:302018-10-23T21:42:34+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज तक वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना राम मंदिर, शिवसेना-भाजपा युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचं राज्यातील अस्तित्व यावर चर्चा केली.
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर घणाघाती टीका केली. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अस्तित्वच काय ? असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला. तसेच माझं पवारसाहेबांना एवढच विचारणं आहे की, त्यांच्या पक्षाचं भविष्य काय ?. ज्या पक्षाचे 6 ते 7 खासदार निवडून येतात, तो पक्ष देशाचं भविष्य ठरवू शकत नाही. केवळ 6 ते 7 खासदार निवडून येणारा त्यांचा पक्ष आहे, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी पक्षाच अस्तित्वच नाकारलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज तक वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना राम मंदिर, शिवसेना-भाजपा युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचं राज्यातील अस्तित्व यावर चर्चा केली. त्यावेळी, भाजपा आणि शिवसेना यांची युती होईलच, असे म्हणताना राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाचं अस्तित्वच नसल्याचे फडणवीस यांनी म्हटले. या दोन्ही पक्षांची विश्वासर्हता संपुष्टात आली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये आमची अन् त्यांची लढाईच नाही. लोक आमच्यासोबत आहेत, लोक मोदीजींच्यासोबत आहेत, असेही फडणवीस यांनी म्हटले.
तसेच माझं पवारसाहेबांना विचारणं आहे, की त्यांच्या पक्षाच अस्तित्वच कुठयं ? महापालिकांच्या निवडणुकीत आम्ही जिंकलो, त्यांचा पक्ष कुठंय? नगरपालिकांच्या निवडणुकीत आम्ही जिंकलो, त्यांचा पक्ष कुठंय? जिल्हा परिषदांच्या निवडणुका झाल्या, त्यांचा पक्ष कुठंय ?. या सर्व निवडणुकांमध्ये त्याचा पराभव झाला आहे. या सर्व निवडणुकांमध्ये आमचा विजय झाला आहे. कारण, आम्ही विकास कामं केली आहेत. त्यामुळेच महाराष्ट्राची जनता आमच्या पाठीशी आहे. मी खात्रीपूर्वक सांगतो, आगामी 2019 च्या निवडणुकीत एनडीएला उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक खासदार महाराष्ट्रच देणार आहे. कारण, महाराष्ट्रातील जनता मोदीजींच्या पाठीशी आहे, अशा आत्मविश्वास फडणवीस यांनी आज तक वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलून दाखवला.