"मुलगा मोठा झाल्यावर वेगळं घर बांधतो, बापाला घरातून बाहेर काढत नसतो"
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2023 09:23 AM2023-10-07T09:23:05+5:302023-10-07T09:24:01+5:30
सुनावणीनंतर राष्ट्रवादी पवार गटातील अनेक नेत्यांनी भावनिक शब्दात भावना व्यक्त केल्या आहेत.
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खरा कोणाचा? यावर शुक्रवारी निवडणूक आयोगापुढे शरद पवार आणि अजित पवार गटांकडून जवळपास दोन तास जोरदार दावे-प्रतिदावे करण्यात आले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत चाललेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या धुमश्चक्रीनंतर आयोगाने सोमवार, ९ ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता पुढील सुनावणी ठेवली आहे. या सुनावणीनंतर राष्ट्रवादीनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भूमिका मांडताना माझी निवड बेकायदेशीर असेल तर सर्वच आमदार बेकायदेशीर ठरतील, असे म्हटले. तसेच, भावनिक प्रतिक्रियाही दिली.
आयोगाच्या तिन्ही आयुक्तांपुढे दुपारी चार वाजता शरद पवार गटाकडून अभिषेक मनु सिंघवी यांनी, तर अजित पवार गटाकडून ज्येष्ठ विधिज्ञ नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर पुढील सुनावणीची तारीख देण्यात आली. या सुनावणीवेळी स्वत: शरद पवार निवडणूक आयोगासमोर उपस्थित होते. सुनावणीनंतर राष्ट्रवादी पवार गटातील अनेक नेत्यांनी भावनिक शब्दात भावना व्यक्त केल्या आहेत.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, शरद पवार संस्थापक आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली चालवलेल्या पक्षाला आतापर्यंत कोणीही चॅलेंज केलेले नाही. त्यांना सर्वांनी सर्वाधिकार दिलेले होते, हात उंचावून. त्याच्या व्हिडिओ क्लिप सर्वांकडे आहेत. चिन्ह गोठवणे हे अन्यायकारक होईल. चिन्ह गोठण्याची एक पद्धत आहे, पण आमच्या वकिलांनी सांगितले की चिन्ह गोठवू नका. शरद पवार यांच्या कार्यशैलीतून हे लोक मोठी झाली आहे, तीच लोक आता शरद पवार यांना प्रश्न विचारत आहेत, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.
''शरद पवार साहेबांच्या कार्यशैलीतूनच मोठी झालेली ही लोकं आहेत. आज तिच लोकं पवार साहेबांच्या कार्याशैलीवर प्रश्न उपस्थित करत आहे. लहान मुलगा जेव्हा मोठा होतो, त्याला स्वतंत्र व्हायचं असतं त्यावेळी तो स्वतःचं घर बांधतो. तो वडिलांना घरातून काढत नाही,'' अशा भावनिक शब्दात जयंत पाटील यांनी सुनावणीनंतर प्रतिक्रिया दिली.
चिन्हा गोठवण्याचा प्रश्नच येत नाही
पंचवीस वर्षे तुम्ही शरद पवारांसोबत काम केले. पंचवीस वर्षानंतर तुम्हाला एखादी गोष्ट लक्षात आली असेल, तर त्याच्याबद्दल शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे. इतक्या उशिरा का लक्षात आले? पक्षांतर्गत निवडणुका ज्यावेळी झाल्या, त्यावेळेस असा प्रश्न कोणी विचारला नाही. चिन्ह गोठवण्याचा प्रश्न येत नाही, कारण पक्ष आणि चिन्ह शरद पवार यांचा आहे. एखाद्याने उद्या भाजपच्या चिन्हबद्दल प्रश्न उपस्थित केला तर ते तुम्ही गोठावणार का?
पवारांची उपस्थिती, अजित पवारांचे फक्त वकील
या सुनावणीसाठी निवडणूक आयोगापुढे स्वतः शरद पवार यांनी उपस्थित राहून या प्रकरणाचे गांभीर्य वाढवले. अजित पवार गटाकडून कोणत्याही नेत्याने या सुनावणीसाठी हजेरी लावली नाही. अजित पवार गटाचे वकील काहीही न बोलता मागच्या दारातून बाहेर पडले.