२ कोटी नोकऱ्या कुठे गेल्या?; अर्थसंकल्पाने पुन्हा सर्वसामान्यांचा भ्रमनिरास केला, तांबे यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 01:56 PM2022-02-01T13:56:10+5:302022-02-01T14:02:46+5:30
केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावरुन महाराष्ट्राचे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी नाराजी दर्शवली आहे.
नवी दिल्ली/ मुंबई: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थमंत्री म्हणून आपला चौथा Union Budget 2022 अर्थसंकल्प सादर केला. सीतारामन यांनी देशातील पायाभूत सुविधांसाठी यावेळी मोठ्या घोषणा केल्या. यंदाच्या अर्थसंकल्पात २०४७ पर्यंतची रुपरेषा असल्याचं सांगत 'पीएम गतिशक्ती योजने'च्या 'मास्टर प्लान'वर सरकार काम करत असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं.
२०२२-२३ साठीचा अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन सांगितले की, डिजिटल अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यावर अधिक भर दिला जाणार आहे. देशाचा विकास दर ९.२७ टक्के असेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. इतक नाही तर पुढील पाच वर्षात ६० लाख नवे रोजगार निर्मिती केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पीएम गती शक्ती योजनेच्या माध्यमातून पायाभूत सुविधेसाठी मोठी गुंतवणूक करणार आहे. तसेच रस्ते, रेल्वे, हवाई, जल वाहतुकीसाठी गुंतवणूक केली जाणार असल्याचे सीतारामन यांनी सांगितले. त्याचप्रमाणे जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारण्यावर भर देण्यात येणार आहे, असं सीतारामन यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावरुन महाराष्ट्राचे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी नाराजी दर्शवली आहे.
सत्यजित तांबे म्हणाले की, अर्थसंकल्पाने पुन्हा एकदा सर्वसामान्यांचा भ्रमनिरास केला. दोन कोटी नोकऱ्या कुठे गेल्या?, असा सवाल उपस्थित करत युवकांचा मोठा भ्रमनिरास झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सर्वसामान्यांकडून कर गोळा करून श्रीमंतांना, मोठ्या कंपन्यांना त्याचा फायदा करून देणं हाच अर्थसंकल्प असल्याची टीका सत्यजित तांबे यांनी केली आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पातून काही क्षेत्रांना दिलासा देण्यात आला आहे. तर काही क्षेत्रांची निराशा झाली आहे. अर्थसंकल्पातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, करदात्यांची निराशा झाली आहे. इनकम टॅक्स स्लॅबमध्ये यंदाच्या अर्थसंकल्पात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सलग सहाव्या वर्षी आयकरात कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आला नसल्याने नाराजी वर्तविण्यात येत आहे.
महिलांसाठी 'मिशन शक्ती'सह ४ महत्वाच्या घोषणा-
केंद्र सरकारच्या या अर्थसंकल्पात महिला आणि बालकल्याणसाठी एक योजना आणली आहे. महिला सक्षमीकरणासाठी मिशन शक्ती आणि सक्षम अंगणवाडी योजना, निर्मला सीतारामन यांनी जाहीर केली आहे. आमच्या सरकारने महिला आणि बालकल्याण विभागासाठी मिशन शक्ती, मिशन वात्सल्य, सक्षम अंगणवाडी आणि पोषण २.० सारख्या योजना तयार केली आहे. ज्यामुळे महिलांना याचा लाभ मिळू शकेल, असं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. तसेच २ लाख अंगणवाड्या अद्ययावत करणार असल्याचेही निर्मला सीतारामन यांनी यावेळी सांगितलं.