‘त्या’ दोन गोळ्या गेल्या कुठे? हायकाेर्टाचा सवाल; गुन्हा दाखल करण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 07:11 AM2024-09-26T07:11:38+5:302024-09-26T07:11:52+5:30
आरोपीच्या वडिलांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याचे तोंडी आदेशही न्यायालयाने दिले
मुंबई : अक्षय शिंदेने पिस्तूल हिसकावून घेत पोलिसांवर तीन गोळ्या झाडल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे, त्यावरही न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले. तसेच, आरोपीवर गोळी दूरवरून झाडली की पॉइंट ब्लँक रेंजने, अशीही विचारणा न्यायालयाने केली. आरोपीच्या वडिलांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याचे तोंडी आदेशही न्यायालयाने दिले. न्यायालयाने पुढील सुनावणी ३ ऑक्टोबरला ठेवली आहे.
आरोपीने बंदूक हिसकावून घेत तीन गोळ्या झाडल्याचा दावा केला जात आहे. त्यातली एक पोलिसाला लागली मग दोन गोळ्या कुठे गेल्या? पोलिस सामान्यत: स्वसंरक्षणार्थ आरोपीच्या हातावर किंवा पायावर गोळी झाडतील; थेट डोक्यात गोळी का घातली, पोलिसांतील एखादा अधिकारी अन्य एका चकमकीत सहभागी होता का हे विचारा, असे न्यायालयाने म्हणताच सरकारी वकिलांनी संबंधित पोलिसाने काही विचार न करताच गोळी झाडल्याचे सांगितले.
आरोपीवर कशाप्रकारे गोळी झाडण्यात आली, याचा न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील अहवाल सादर करण्याचे तसेच सीडीआरही देण्याचे निर्देश न्यायालयाने सरकारला दिले. विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या मुलाला बळी चढवण्यात आल्याचा आरोप अण्णा शिंदे यांनी केला आहे.
फुटेज जतन करा
आरोपीला बराकमधून काढल्यापासून कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात नेण्यापर्यंतचे सर्व सीसीटीव्ही फुटेज जतन करा, असे निर्देशही न्यायालयाने यावेळी दिले. तसेच न्यायालयाने सीआयडीचे अधिकारी सुनावणीसाठी का नाहीत, असा सवाल केला.
सीआयडीकडे कागदपत्रे देण्यात येतील, असे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाची कागदपत्रे तातडीने वर्ग केलीत मग आता का नाही तेवढी तत्परता दाखवत, असा सवालही न्यायालयाने यावेळी केला.