वादळ असो, पाऊस असो सभा होणारच; पावसातली सभा फायदेशीर, अजित पवारांच्या वक्तव्यानं एकच हशा!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 03:35 PM2023-03-15T15:35:56+5:302023-03-15T15:38:14+5:30
सत्ताधाऱ्यांविरोधातील रणनिती ठरवण्यासाठी महाविकास आघाडीनं आज मुंबईत बैठक आयोजित केली होती.
मुंबई-
सत्ताधाऱ्यांविरोधातील रणनिती ठरवण्यासाठी महाविकास आघाडीनं आज मुंबईत बैठक आयोजित केली होती. या बैठकीला संबोधित करताना अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीच्या सभा यशस्वी करण्याचं आवाहन केलं. राज्यात तीन पक्ष एकत्र आल्यानंतर काय परिस्थिती होते हे आपण पाहिलं आहे. आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून आयोजित केल्या जाणाऱ्या सभा ओसंडून वाहिल्या पाहिजेत, असं आवाहन अजित पवार यांनी यावेळी केलं.
अजित पवार यांनी यावेळी पावसातील सभेचा आपल्याला फायदाच होतो असं मिश्किलपणे म्हटलं आणि सभागृहात एकच हशा पिकला. "महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यात आता ठिकठिकाणी सभा होणार आहेत. सभा ओसंडून वाहिल्या पाहिजेत याची जबाबदारी प्रत्येत कार्यकर्त्याची आहे. मी आज तुम्हाला सांगतो, वादळ असो, पाऊस असो किंवा मग अवकाळी पाऊस असो...सभा होणारच. पाऊस आला तर चांगलंच आहे कारण पावसातली सभा आपल्याला फायदेशीर ठरते", असं अजित पवार म्हणाले आणि सभागृहात एकच हशा पिकला.
शरद पवार यांनी साताऱ्यात भर पावसात घेतली होती सभा
साताऱ्यात २०१९ मध्ये श्रीनिवास पाटील यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सभा घेतली होती. मुसळधार पाऊस सुरू असतानाही शरद पवार यांनी आपलं भाषण सुरू ठेवलं होतं. भर पावसातील भाषणाच्या शरद पवारांची व्हिडिओ क्लीप सोशल मीडियात त्यावेळी चांगलाच चर्चेचा विषय ठरली होती. इतकंच नव्हे, तर श्रीनिवास पाटील मोठ्या मताधिक्यानं निवडूनही आले होते. एका सभेमुळे संपूर्ण वातावरण फिरलं होतं आणि पवारांनी आपली जादू दाखवली होती. याच सभेचा धागा पकडत आज अजित पवार यांनी भाष्य केलं.
महाविकास आघाडीच्या राज्यात सभा
नागपूर- १६ एप्रिल
मुंबई- १ मे
पुणे- १४ मे
कोल्हापूर- २८ मे
नाशिक- ३ जून