महाविकास आघाडी सरकारचे स्टिअरिंग नेमके कुणाच्या हाती? अजितदादांच्या त्या फोटोमुळे तर्कवितर्कांना ऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 10:13 AM2020-07-27T10:13:07+5:302020-07-27T10:58:13+5:30
राज्यातील सरकार हे तीन पक्षांचे असले तरी या सरकारचे स्टिअरिंग माझ्याच हातात आहे, असे विधान करून एक दिवस उलटत नाही तोच अजितदादांनी शेअर केलेल्या एका फोटोमुळे तर्कवितर्कांना उत आला आहे.
मुंबई - शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सरकार हे तीन पक्षांचे असले तरी या सरकारचे स्टिअरिंग माझ्याच हातात आहे, असे विधान करून या सरकारवर आपलीच पकड असल्याचे अधोरेखित केले होते. मात्र या विधानाला एक दिवस उलटत नाहीत तोच आज उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या असून, शुभेच्छा देताना अजितदादांनी शेअर केलेल्या एका फोटोमुळे तर्कवितर्कांना उत आला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या ट्विटर हॅँडलवरून आज सकाळीच उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यात ते म्हणतात. ‘’शिवसेना पक्षप्रमुख आणि महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा.’’ दरम्यान, या शुभेच्छा देताना अजितदादांनी खाली उद्धव ठाकरे यांनी बारामतीला भेट दिली होती तेव्हाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोचं वैशिष्ट्य म्हणजे उद्धव ठाकरे आणि अजित पवार हे एका छोट्या गाडीतून जात असून, त्यामध्ये गाडी अजित पवार चालवत आहेत. दरम्यान, अजित पवार यांच्या या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
Best wishes to the Hon. CM of Maharashtra, ShivSena Party President & Maha Vikas Aghadi Leader, Shri. Uddhav Thackeray ji. Wish you a healthy & long life! @OfficeofUT@CMOMaharashtrapic.twitter.com/PlrNgNg508
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 26, 2020
दरम्यान, राज्यात तीन चाकी सरकार असलं तरी या सरकारचं स्टिअरिंग माझ्याच हातात आहे, असं स्पष्ट मत उद्धव ठाकरे यांनी मांडलं होतं. उद्धव ठाकरे म्हणाले होते की, हे तीन चाकी सरकार आहे असं म्हणतात, पण ते गरीबांचं वाहन आहे. बुलेट ट्रेन की रिक्षा यात निवड करायची झाली तर मी रिक्षाच निवडेन. मी गरीबांच्या माने उभा राहीन. ही माझी भूमिका मी बदलत नाही. मी मुख्यमंत्री झालो म्हणून मी बुलेट ट्रेनच्या मागे उभा राहीन, असा समज कुणी करून घेऊ नये. माझं मत मी लोकांच्या सोबत असल्याने बुलेट ट्रेन नको असंच आहे. या सरकारला तीन चाकं, तीन चाकं म्हणून म्हणून संबोधताय, पण ही तीन चाकं चालताहेत ना एका दिशेने मग तुमच्या पोटात का दुखतंय. केंद्रात किती चाकं आहेत. आमचं तर हे तीन पक्षांचं सरकार आहे. केंद्रात किती पक्षाचं सरकार आहे. सांगा ना, मी जेव्हा गेल्या वेळी एनडीएच्या बैठकीला गेलो होतो तेव्हा तर ३०-३५ चाकं होती. म्हणजे रेल्वेगाडीच होती, असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लगावला होता.