धोंडो कर्वे कोण, कळणार कसे ? पुतळा हटविण्याचे प्रयत्न उच्च न्यायालयाने उधळून लावले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 06:18 AM2023-10-21T06:18:25+5:302023-10-21T06:18:34+5:30
कोथरूड येथील कर्वे मार्गावर महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा पुतळा बसविण्यात आला आहे. हा पुतळा येथील त्रिकोणी कोपऱ्यात असून, येथील रस्त्याचे रुंदीकरण केले जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातच शिक्षणमहर्षी भारतरत्न धोंडो केशव कर्वे यांचा पुतळा हटविण्याचे प्रयत्न उच्च न्यायालयाने उधळून लावले आहेत. महिलांच्या हितासाठी काम करणाऱ्या कर्वे यांचा पुतळा हटविल्यास त्यांच्या कार्याची माहिती आजच्या पिढीला कळणार नाही, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने पुतळ्याला विरोध करणारी याचिका फेटाळून लावली.
कोथरूड येथील कर्वे मार्गावर महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा पुतळा बसविण्यात आला आहे. हा पुतळा येथील त्रिकोणी कोपऱ्यात असून, येथील रस्त्याचे रुंदीकरण केले जाणार आहे.
... अन् याचिका फेटाळली
या पुतळ्यामुळे येथील होर्डिंग्जला अडथळा होत असल्याने हा पुतळा हटवण्याचे आदेश न्यायालयाने पुणे महापालिकेला द्यावेत, अशी मागणी करत ९० वर्षीय इंदुमती बोरसे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती गौतम पटेल व न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी न्यायालयाने याचिकाकर्त्यांना खडसावत याचिका फेटाळून लावली.
न्यायालय म्हणाले...
महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या कार्याबाबत नवीन पिढी अनभिज्ञ कशी? पुतळ्याला महत्त्व असल्यामुळेच तो चौकात बसविण्यात आला आहे. होर्डिंग्जच्या आड येतोय, होर्डिंग्जमागे तो लपविण्यासाठी पुतळा या ठिकाणी बसवलेला नाही. इतकेच काय तर केवळ उत्पन्न मिळावे यासाठी पुतळा हटवला जाऊ शकत नाही.