'ती महाराष्ट्रातली एकमेव शक्ती आणि व्यक्ती कोण'? रोहित पवारांचा इशारा कोणाकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 01:35 PM2023-07-04T13:35:27+5:302023-07-04T13:44:08+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही आता फुट पडली असून अजित पवारांच्या पाठिंब्याला आपलं कुठलंही समर्थन नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
मुंबई - शिवसेनेनंतर राज्यातील दुसरा सर्वात मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही उभी फूट पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यानंतर, आता राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याचे दिसून येते. राष्ट्रवादीचे बहुसंख्य आमदार आपल्या पाठिशी आहेत असा दावा अजित पवारांकडून केला जात आहे. तर ९ आमदार वगळता बाकीचे शरद पवारांच्या सोबत असल्याचे राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. त्यात दोन्ही गटाकडून येत्या ५ जुलैला मुंबईत बैठकीचे आयोजनही करण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीसांनीच राष्ट्रवादी फोडल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात होत आहे. त्यातच, आमदार रोहित पवार यांनी ट्विट करुन प्रश्न विचारला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही आता फुट पडली असून अजित पवारांच्या पाठिंब्याला आपलं कुठलंही समर्थन नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांनी कराडमधील प्रितीसंगमावर जाऊन आता पुन्हा जनतेतून लढा उभारणार म्हणत दौऱ्याला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, आता शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट राष्ट्रवादीत पडल्याचे दिसून येते. त्यात, पवार कुटुंबातील खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार हे शरद पवारांसमवेत आहेत. त्यासोबतच, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक आमदारही शरद पवार यांच्यासमवेत असल्याचे सांगत आहेत. मात्र, घडलेल्या घटनेवरुन राष्ट्रवादीतीतल अनेक नेत्यांमध्ये अस्वस्थता दिसून येते. आमदार रोहित पवार यांनी ट्विट करुन भाजपवर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्राची राजकीय संस्कृती चिखलात तुडवणारी... मराठी माणसाची अस्मिता असलेल्या शिवसेनेला आपापसात झुंजायला लावून विकृत आनंद घेणारी... आणि हाच प्रयोग आता राष्ट्रवादीच्या बाबतीत करणारी महाराष्ट्रातली एकमेव शक्ती आणि व्यक्ती कोण असावी?, असा प्रश्न रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन विचारला आहे. रोहित पवार यांचा रोख नेमका कोणाकडे आहे, त्यांनी कुणाकडे बोट दाखवण्याचा प्रयत्न केलाय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
महाराष्ट्राची राजकीय संस्कृती चिखलात तुडवणारी...
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 4, 2023
मराठी माणसाची अस्मिता असलेल्या शिवसेनेला आपापसात झुंजायला लावून विकृत आनंद घेणारी... आणि हाच प्रयोग आता राष्ट्रवादीच्या बाबतीत करणारी महाराष्ट्रातली एकमेव शक्ती आणि व्यक्ती कोण असावी?
आमदार रोहित पवार यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीसांकडे बोट दाखवले आहे. त्यांच्या या ट्विटवर अनेकांनी कमेंट करुनही फडणवीसांचेच नाव घेतले आहे. तर, अनेकांनी रोहित पवारांना ट्रोलही केलंय. काहींना राष्ट्रवादी पक्ष आणि शरद पवार यांचेच दाखले या पोस्टच्या कमेंटवर आमदार पवार यांना दिले आहेत.
दोन्ही नेत्यांनी बोलावली बैठक
शरद पवारांनी पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची ५ जुलै रोजी बैठक बोलावली असून, अजित पवार गटानेही ५ जुलै रोजीच वांद्रे येथील एमईटी संस्थेत पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, प्रदेश प्रतिनिधी यांना बोलावण्यात आले असून, राज्यभरातून राष्ट्रवादीतील पदाधिकारी उपस्थित राहतील, असा विश्वास सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षांनी मला कालच प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्तीचे पत्र दिल्याचे सांगत लवकरच पक्षाच्या अन्य नियुक्त्या केल्या जातील असे त्यांनी सांगितले.