संदीपसिंहचा भाजपमधील ‘तो’ बॉस कोण? - सचिन सावंत यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 06:14 AM2020-08-30T06:14:09+5:302020-08-30T06:15:53+5:30

या प्रकरणाशी जोडला गेलेला संदीपसिंह याने प्रदेश भाजप कार्यालयात तब्बल ५३ वेळा फोन केल्याची माहिती मिळत आहे. ती खरी असल्यास भाजप कार्यालयातील त्याचा ‘तो’ बॉस कोण आणि भाजपची संदीपसिंहशी एवढी जवळीक कशी, या प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजेत

Who is Sandeep Singh's boss in BJP? - Question by Sachin Sawant | संदीपसिंहचा भाजपमधील ‘तो’ बॉस कोण? - सचिन सावंत यांचा सवाल

संदीपसिंहचा भाजपमधील ‘तो’ बॉस कोण? - सचिन सावंत यांचा सवाल

googlenewsNext

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणातील तपासाबाबत आतापर्यंत भाजपच्या नेत्यांकडून प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, आता सुशांतसिंहचा पूर्वाश्रमीचा मित्र आणि त्याच्या मृत्यूनंतर आकस्मिकपणे या प्रकरणाशी जोडला गेलेला संदीपसिंह याने प्रदेश भाजप कार्यालयात तब्बल ५३ वेळा फोन केल्याची माहिती मिळत आहे. ती खरी असल्यास भाजप कार्यालयातील त्याचा ‘तो’ बॉस कोण आणि भाजपची संदीपसिंहशी एवढी जवळीक कशी, या प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेतचा संदीपसिंहचा फोटोही सावंत यांनी टिष्ट्वट केले आहे. त्यासंदर्भात ते म्हणाले की, सुशांतसिंहच्या मृत्यूप्रकरणी ड्रग कनेक्शनसंदर्भात संदीपसिंह चौकशीच्या रडारवर असताना तो लंडनला पळून जाऊ शकतो, असे मीडिया रिपोर्ट येत आहेत. ड्रग डिलिंगशी संदीपसिंहचे नाव जोडले गेल्याने भाजपशी त्याचे असलेले घनिष्ठ संबंध पाहता ड्रग माफियांशी भाजपचाही काही संबंध आहे का, याची चौकशी झाली पाहिजे.

संदीपसिंहने १ सप्टेंबर ते २३ डिसेंबर २०१९ या काळात महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यालयात ५३ वेळा फोन केले. तो या कार्यालयात कोणाशी बोलत होता? भाजप आणि संदीपसिंह यांच्यात एवढे घनिष्ट संबंध होते की, मोदींचा चरित्रपट बनवण्याची जबाबदारी त्याला दिली. त्याबदल्यात गुजरात सरकारने त्याच्या ‘लेजंड ग्लोबल स्टुडियो’ या कंपनीशी १७७ कोटींचा सामंजस्य करार केला. या करारासाठी फक्त संदीपसिंहचीच कंपनी कशी काय होती? असे प्रश्नही सावंत यांनी उपस्थित केले आहेत. २०१८ मध्ये भारतीय दूतावासाने प्रायोजित केलेल्या मॉरिशस भेटीदरम्यान अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात संदिपसिंह आरोपी आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

संदीपसिंहचे भाजप कनेक्शन तपासा; राज्य शासनाची सीबीआयला विनंती

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर चित्रपट बनविणारा संदीपसिंह याचे भाजपशी तसेच ड्रग माफियांशी, तसेच सुशांतसिंह राजपूत आत्महत्येशी कथित संबंध असल्याच्या तक्रारी आमच्या विभागाने सीबीआयकडे पाठविल्या आहेत, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी पत्रकारांना दिली.
सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात भाजपकडून राज्याच्या गृहखात्यावर तसेच सरकारमधील काही महत्त्वाच्या व्यक्तींवर आरोप केले जात असताना आता अनिल देशमुख यांनी पलटवार केला आहे. सुशांतसिंह प्रकरणाची चौकशी सीबीआय करीत आहे आणि संदीपसिंहबद्दल ज्या तक्रारी या अनुषंगाने आलेल्या आहेत. त्यांची चौकशीही सीबीआयने करावी या भूमिकेतून राज्य शासनाने तक्रारी सीबीआयकडे सोपविल्या आहेत, असे देशमुख म्हणाले.
आपल्याला कल्पना आहे की भाजपच्या अनेक नेत्यांचा बॉलिवूडशी जवळचा संबंध आहे, त्यांचे पाच वर्ष सरकार होते. त्यांनी त्यावेळी याबाबतीत काय केले, हा पण एक मोठा प्रश्न आहे, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.

तपासातील पोलीस उपायुक्तांना कोरोनाची लागण
अभिनेता सुशांतसिंह मृत्यूप्रकरणाच्या तपासाशी संबंधित असलेले परिमंडळ नऊचे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सीबीआय तपास पथकातील काही अधिकारी गेल्या आठवड्याभरात दोन, तीन वेळा त्यांना भेटले होते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित अधिकारीही स्वत:ची वैद्यकीय तपासणी करून घेणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. सुशांतसिंह मृत्यूप्रकरणाचा तपास वांद्रे पोलीस करीत असताना तो उपायुक्त त्रिमुखे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. त्यानिमित्त संशयित रिया चक्रवर्ती हिची त्यांनी चौकशी केली होती. रिया त्यांच्याशी फोनवर सातत्याने संपर्कात होती. त्यांच्यात व्हॉट्सअ‍ॅप मेसेजवर संभाषण झाल्याचेही रियाच्या मोबाइल तपासातून स्पष्ट झाले आहे.

रियाला नेमके कोणते प्रश्न विचारले?
आठ जूनला घर सोडून
जाण्याचे कारण काय?
८ ते १४ जूनपर्यंत त्याच्याशी संपर्क केला होता का?
का केला नाही?
त्याच्या मेसेजला का रिप्लाय दिला नाही? मोबाइल नंबर ब्लॉक का केला होता?
सुशांतला तू कोणते ड्रग्स द्यायची?
सुशांतला कोणता आजार होता?
उपचारांसाठी तू सुशांतला कोणत्या डॉक्टरकडे नेले?
सुशांतच्या आजाराबाबत त्याच्या घरच्यांना का नाही सांगितले?
सुशांतला दिलेले ड्रग कोण पुरवायचे?

सीबीआयनेच सांगितले, रियाला सुरक्षा पुरवा
- डीसीपी शिंगे
मुंबई : रिया चक्रवर्तीला चौकशीसाठी सीबीआय कार्यालयात जाताना सुरक्षा पुरविल्याबाबत मुंबई पोलिसांवर तिला ‘रेड कार्पेट’ ट्रीटमेंट दिल्याचा आरोप केला जात आहे. मात्र सीबीआयच्या लेखी विनंतीपत्रानुसारच तिला ही सुरक्षा पुरविल्याचे परिमंडळ ८चे पोलीस उपायुक्त मंजुनाथ शिंगे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title: Who is Sandeep Singh's boss in BJP? - Question by Sachin Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.