Sharad Pawar: राष्ट्रवादीचा पुढील अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार?; पक्षातील हे सदस्य घेणार निर्णय, पाहा नावं!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2023 01:47 PM2023-05-02T13:47:05+5:302023-05-02T16:11:10+5:30
Sharad Pawar: रिक्त झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सदस्यांची एक समिती देखील शरद पवारांनी गठीत केली आहे.
मुंबई: शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनेबाबत पुढे काय करायचं याबाबत मी एक समिती स्थापन करणार असून यात सदस्य निर्णय घेतील, असं शरद पवार यांनी सांगितलं. मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटरमध्ये 'लोक माझा सांगती' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात आज घोषणा केली.
१९९९मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. तेव्हापासून गेली २४ वर्षे राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. सार्वजनिक जीवनातील १ मे १९६० पासून सुरु झालेला हा संपुर्ण प्रवास गेली ६३ वर्षे अवरित चालू आहे. त्यापैकी ५६ वर्षे मी कुठल्या ना कुठल्या सभागृहाचा सदस्य किंवा मंत्री म्हणून सातत्याने काम करत आहे. संसदेतील ३ वर्षे शिल्लक आहेत. या काळात राज्याच्या आणि देशाच्या प्रश्नांमध्ये अधिकाधीक लक्ष घालण्याचा माझा भर असेल, याशिवाय मी कोणतीही अन्य जबाबदारी घेणार नाही. १ मे १९६० ते १ मे २०२३ इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर आता कुठेतरी थांबवण्याचा विचार करणे आवश्यक आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं.
VIDEO | Workers of Nationalist Congress Party (NCP) appeal Sharad Pawar to take back his decision of stepping down as the party president. #SharadPawarpic.twitter.com/CigPSe27bz
— Press Trust of India (@PTI_News) May 2, 2023
गेल्या ६० वर्षांत महाराष्ट्राने व आपण सर्वांनी मला खांबीर साथ व प्रेम दिले, हे मी विसरु शकत नाही. परंतु यापुढे पक्ष संघटनेच्या संदर्भात पुढील दिशा ठरवणे आवश्यक वाटते. रिक्त झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सदस्यांची एक समिती देखील शरद पवारांनी गठीत केली आहे. त्यामुळे पुढील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं.
यासमितीत खालील सदस्यांचा समावेश आहे.
प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के.के. शर्मा, पी.सी. चाको, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, अनील देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड.
इतर सदस्य- फौजिया खान, धीरज शर्मा, सोनिया दूहन