देशाबाहेर गेलेला पैसा काेणाचा? राहुल गांधी यांचा घणाघात, पुन्हा जेपीसी चौकशीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 07:10 AM2023-09-01T07:10:49+5:302023-09-01T07:24:22+5:30
‘इंडिया’च्या बैठकीसाठी मुंबईत दाखल होताच काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी उद्योग समूहावर हल्लाबोल केला.
मुंबई : अदानी उद्योग समूहाने देशाच्या बाहेर एक अब्ज डॉलर पाठवले आणि ते पैसे पुन्हा विविध मार्गांनी देशात आणले गेले. या सगळ्या व्यवहारामागे अदानी उद्योग समूहाचे गौतम अदानी यांचा भाऊ विनोद अदानी हा मास्टरमाइंड असल्याचा खळबळजनक दावा करत या सगळ्या प्रकरणाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाठिंबा असल्याची टीका काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केली आहे.
‘इंडिया’च्या बैठकीसाठी मुंबईत दाखल होताच काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी उद्योग समूहावर हल्लाबोल केला. अदानी प्रकरणात यापूर्वीही आम्ही संयुक्त संसदीय समितीच्या चौकशीची (जेपीसी) मागणी केली होती.
जी-२० बैठकीपूर्वी प्रकार आला समाेर
- जी-२० देशाचे नेते भारतात येण्याच्या काही दिवस आधी हा गैरप्रकार समोर आला असल्याने हे नेते विचारत असतील की ही अशी कोणती विशेष कंपनी आहे ज्याला पंतप्रधान पाठीशी घालत आहेत.
- देशातील आर्थिक स्थिती पारदर्शक हवी आणि येथील व्यापारात प्रत्येकाला समान संधी असायला हवी. मात्र, या प्रकरणामुळे ते दिसत नसून यामुळे जागतिक पातळीवर देशावर प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात, असेही ते म्हणाले.
चिनी नागरिक मास्टरमाइंड
आपल्या देशातून विविध देशांत गेलेला आणि परत आलेला हा पैसा कुणाचा आहे, अदानींचा की आणखी कुणाचा, असे सवाल राहुल गांधींनी विचारले. परेदशातून हा पैसा देशात परत आणून अदानी कंपनीचे शेअर्स चढ्या भावाने विकत घेतले गेले. या पैशातूनच अदानीने विमानतळे, बंदरे, सिमेंट कंपन्या अशा विविध मालमत्तांची खरेदी केली आहे.
या सगळ्या प्रकरणाचा मास्टरमाइंड विनोद अदानी असून या पैशांच्या हेराफेरीत आणखी दोन भागीदार आहेत. यात एकाचे नाव नासिर अली शबान अली असून दुसरा चीनचा नागरिक असून त्याचे नाव चाँग चुंग लिंग आहे.
या दोन विदेशी नागरिकांच्या या सगळ्या प्रकरणातील सहभाग आणि त्यांच्या माध्यमातून देशातील पायाभूत सुविधांची केली गेलेली खरेदी हा देशाच्या सुरक्षेशी खेळ असल्याची टीका राहुल गांधींनी केली.
अदानी समूहाविरोधातील हा सगळा गैरव्यवहार जागतिक पातळीवरील दोन नामांकित आर्थिक दैनिकांनी पुराव्यांसह समोर आणला आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी या आरोपांची चौकशी का करत नाहीत, असा सवालही त्यांनी विचारला. यापूर्वी सेबीने केलेल्या चौकशीत अदानी समूहाला क्लीन चिट दिली गेली. त्यावेळी क्लीन चिट देणारी व्यक्ती नंतर अदानीच्या कंपनीत संचालक म्हणून रुजू झाला.