देहूतील कार्यक्रमात अजित पवारांना का बोलू दिलं नाही?, भाजपकडून उत्तर आलं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 11:25 AM2022-06-15T11:25:05+5:302022-06-15T11:29:09+5:30

नरेंद्र मोदींसोबत लोकार्पण कार्यक्रमासाठी व्यासपीठावरही अजित पवार उपस्थित होते.

Why Ajit Pawar was not allowed to speak in the program in Dehu, came the answer from BJP Devendra Fadanvis | देहूतील कार्यक्रमात अजित पवारांना का बोलू दिलं नाही?, भाजपकडून उत्तर आलं

देहूतील कार्यक्रमात अजित पवारांना का बोलू दिलं नाही?, भाजपकडून उत्तर आलं

Next

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी लोहगाव विमानतळावर गेलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खांद्यावर मोदींनी हात ठेवला. त्यानंतर दोघेही देहू येथील कार्यक्रमासाठी गेले. या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाले; मात्र प्रोटोकॉलनुसार पालकमंत्र्यांना संधी अपेक्षित असताना त्यांना वंचित ठेवले. त्यांचे नाव दिल्लीतूनच कट झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे, राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते नाराज झाले असून हा महाराष्ट्राचा अपमान असल्याची भावना राष्ट्रवादीने व्यक्त केली आहे. आता, भाजपने राष्ट्रवादीच्या प्रश्नाचे उत्तर दिलं आहे. तसेच, देहूतील कार्यक्रम हा सरकारी नसून खासगी होता, असेही भाजपने म्हटले आहे. 

नरेंद्र मोदींसोबत लोकार्पण कार्यक्रमासाठी व्यासपीठावरही अजित पवार उपस्थित होते. परंतु, या कार्यक्रमात भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मनोगत व्यक्त केले. मात्र, अजित पवार यांना बोलण्याचा मान दिला नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नाराजी व्यक्त केली. हा महाराष्ट्राचा अपमान असल्याची टिका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. तर, अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री आहेत, याचे भान पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांना असायला हवे होते, या शब्दांत आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी खंत व्यक्त केली होती. अमोल मिटकरींच्या टिकेला सदाभाऊ खोत यांनी उत्तर दिलं आहे. भाजपने ट्विट करुन आपली भूमिका मांडली. 


देहू येथील कार्यक्रम हा सरकारी नव्हता, तर खासगी होता. प्रोटोकॉल हा सरकारी कार्यक्रमाला असतो, खाजगी कार्यक्रमाला नाही. याशिवाय स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अजित पवारांना भाषण करण्याची विनंती केली. पण, त्यांनी नकार दिला, असे भाजपने अधिकृतपणे सांगितले आहे. तसेच, नरेंद्र मोदींच्या तीन कार्यक्रमांपैकी दोन कार्यक्रमात फडणवीस यांचे भाषण न होऊनही भाजपाकडून कोणताही आक्रस्ताळेपणा झालेला नाही. कारण, भाजपासाठी वारकरी, स्वातंत्र्यसेनानींचे स्मारक, एका वृत्तपत्राची द्विशताब्दी हे विषय महत्त्वाचे आहेत, स्वत:चा अहंकार नाही, अशा शब्दात भाजपने राष्ट्रवादी समर्थकांना टोलाही लगावला आहे. 

दरम्यान, प्रोटोकॉलनुसार विमानतळावरील स्वागतासाठी पालकमंत्री अजित पवार, खासदार गिरीश बापट, भाजपचे शहराध्यक्ष योगेश मुळीक, आमदार माधुरी मिसाळ उपस्थित होते. मोदी यांना अजित पवारांनी हात जोडले. मोदी यांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. त्यामुळे अजित पवार यांच्या भाजपप्रेमाविषयीच्या राजकीय चर्चेला दुपारी सोशल मीडियावर उधाण आले.

काय म्हणाले सदाभाऊ खोत

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. तुम्हाला प्रोटोकॉल समजला का?. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलल्यामुळे उपमुख्यमंत्री बोलले नाहीत. तो आठवावा शपथविधी....! असं खोचक ट्विट सदाभाऊ खोत यांनी केलं आहे. तसेच, आपल्या ट्विटमध्ये राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांना मेन्शनही केलं आहे.
 

Web Title: Why Ajit Pawar was not allowed to speak in the program in Dehu, came the answer from BJP Devendra Fadanvis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.