"मोदी-शहांचा हस्तक याचसाठी का? महाराष्ट्रातील १ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या"
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 08:30 PM2022-09-13T20:30:37+5:302022-09-13T20:31:59+5:30
फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात १.५८ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार होता. महाविकास आघाडी सरकारने या प्रकल्पावर जवळपास ९० टक्के चर्चाही केली होती
मुंबई - राज्यात उभारणारा वेदांता ग्रुपचा मोठा प्रकल्प गुजरातला जाणार आहे. पुण्यातील तळेगावजवळ हा प्रकल्प उभारण्यात येणार होता. महाविकास आघाडी सरकारने यासंदर्भातील पूर्वतयारी केली असून याची घोषणाही झाली होती. मात्र, आता हा प्रकल्प गुजरातला जाणार आहे. त्यावरुन, विरोधकांनी राज्य सरकारला आणि शिंदे-फडणवीसांना धारेवर धरलं आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात यांनी सरकावर जोरदार प्रहार केला. तर, नाना पटोले यांनीही एकनाथ शिंदेंच्या औरंगाबादेतील भाषणाचा संदर्भ देत जोरदार निशाणा साधला आहे.
फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात १.५८ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार होता. महाविकास आघाडी सरकारने या प्रकल्पावर जवळपास ९० टक्के चर्चाही केली होती. पण सरकार बदलताच हा प्रकल्प गुजरात राज्यात गेला, याचे नेमके गौडबंगाल काय हे जनतेला कळाले पाहिजे. या प्रकल्पातून १ लाख रोजगार निर्माण होणार होते. एवढा मोठा प्रकल्प गुजरातला गेल्याने महाराष्ट्रातील तरुणांनी काय फक्त दहिहंड्याच फोडत बसायचे काय? असा संतप्त सवाल काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat)यांनी केला आहे. त्यानंतर, आता नाना पटोले यांनीही तोफ डागली.
प्रस्थापित मविआ सरकार पाडून, सुरत-गुवाहाटी फिरून, हिंदुत्वाचा बनावटी चेहरा घेऊन ईडी सरकार सत्तेत आले. आमच्या सरकारच्या काळात मंजूर झालेला फॉक्सकॉन-वेदांता हा इतका मोठा महाराष्ट्रातील प्रकल्प आता गुजरातला हलवण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण होणाऱ्या सुमारे 1 लाख नोकऱ्या गुजरातच्या घशात गेल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की त्यांना मोदी- शहा यांचा हस्तक होणे मंजूर आहे, ते याचसाठी का?, असा सवाल नाना पटोले यांनी विचारला आहे.
थोरात यांनीही केली टिका
महाराष्ट्र हे गुंतवणुकदारांच्या पसंदीचे पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. महाविकास आघाडीच्या सरकारनेही अडीच वर्षांच्या काळात मोठी गुंतवणूक राज्यात आणली व त्यातून राज्यातील लाखो तरुणांच्या हाताला काम दिले. परंतु मविआचे सरकार जाताच अडीच महिन्यात असे काय झाले की फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला. हा प्रकल्प गुजरातमध्ये जात असल्याची कोणतीच माहिती राज्य सरकारला समजली नाही का? हा प्रकल्प महाराष्ट्रातच रहावा यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने काय प्रयत्न केले? असे सवालही थोरात यांनी केले आहेत.
काय म्हणाले होते एकनाथ शिंदे
पैठणच्या सभेत एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहांचे कौतुक केले. शिंदे म्हणाले की, 'निवडणुकीवेळी नरेंद्र मोदी आणि बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावून मतं मागितले होते. लोकांनी भाजप-सेनेला सत्तेत आणले, पण यांनी विरोधकांसोबत हातमिळवणी केली. भारताचा शत्रू असलेल्या मेमनच्या कबरीचे उद्दातीकरण यांच्याच काळात झाले. मेमनचे हस्तक होण्यापेक्षा आम्ही नरेंद्र मोदी-अमित शहा यांचे हस्तक होऊ.'