आधीच राज्यसभेवर असलेल्या प्रफुल पटेलांना उमेदवारी का दिली? सुनील तटकरेंनी लॉजिक सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 10:39 AM2024-02-15T10:39:19+5:302024-02-15T10:46:06+5:30
राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज १५ फेब्रुवारी शेवटची तारीख आहे.
NCP ( Marathi News ) : मुंबई- राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज १५ फेब्रुवारी शेवटची तारीख आहे. दरम्यान, काल सर्वच पक्षांनी आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने प्रफुल पटेल यांचे नाव जाहीर केले. पण, पटेल हे आधीच राज्यसभेवर निवडून गेले आहेत, त्यामुळे पुन्हा त्यांच्या उमेदवारीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. दरम्यान, आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
भाजपाकडून २८ पैकी केवळ ४ जणांना तिकीट; ४ मंत्र्यांना डच्चू, लोकसभेत उतरविणार?
"राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून आम्ही प्रफुल पटेल यांची निवड केली आहे. काही तांत्रिक बाबींचा विचार करत पक्षाच्या कोअर ग्रुपने हा निर्णय घेतला आहे. ते निर्वाचित झाल्यानंतर त्यांची जागा रिक्त होईल, मे महिन्यात त्या जागेची निवडणूक लागेल. त्यावेळी इतर नावांचा विचार आम्ही करणार आहोत, अशी माहिती सुनिल तटकरे यांनी दिली.
सुनिल तटकरे म्हणाले, प्रफुल पटेल यांच्या जागी पोटनिवडणूक लागेल. ती जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवेल, त्यासाठी भाजप आणि शिवसेनेची संमती घेतली आहे. काही तांत्रिक गोष्टींचा विचार करुन आमच्या कोअर ग्रुपने हा निर्णय घेतला आहे, असंही तटकरे म्हणाले. पक्षासमोर दहा जणांनी राज्यसभेची उमेदवारी मिळावी म्हणून मागणी केली होती. याबाबत पक्षाच्या सर्व वरिष्ठांनी सर्व बाजूचा विचार करुन पक्षाने हा निर्णय घेतला आहे, असं तटकरे म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील उमेदवारांबाबत काल दिवसभर अनेक नावे समोर येत होते. यात पार्थ पवार, सुनील तटकरे, बाबा सिद्धीकी, समीर भुजबळ यांच्या नावाची चर्चा सुरू होती. खासदार प्रफुल पटेल यांच्या अपात्रतेची चर्चा सुरू होती त्यामुळे त्यांना उमेदवारी घोषित केली असल्याचे बोलले जात आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार अपात्रतेवर विधानसभा अध्यक्ष निकाल देणार आहेत.
राष्ट्रवादी आमदार अपात्र आज निकाल
आज १५ फेब्रुवारी रोजी आमदार अपात्रतेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल देणार आहेत. काही दिवसापूर्वी पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत केंद्रीय निरवडणूक आयोगाने निकाल दिला. राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि चिन्ह अजित पवार गटाकडे देण्यात आले.