"विधानसभा सभागृहात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनाच २ माईक का?"
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 04:25 PM2022-08-18T16:25:57+5:302022-08-18T16:26:26+5:30
या सदस्यांवर कुणी पाळत ठेवतंय का? या सदस्यांबाबतीत कुणाला विशेष माहिती हवीय का? हे २ माईक का आहेत. हा माझा हरकतीचा मुद्दा आहे असं शेलार म्हणाले.
मुंबई - विधानसभेचे अध्यक्ष म्हणून तुम्ही सगळ्या सदस्यांच्या अधिकाराची काळजी घेता. सभागृहातील सगळे सदस्य समानपद्धतीवर काम करतात. सगळ्यांनी महाराष्ट्राचा एकत्रित समान विचार करतोय. सगळ्यांचे अधिकार समान, विशेषाधिकार समान आहेत. परंतु सभागृहातील ३ सदस्यांना फक्त २ माईक आहेत. अध्यक्षांनाही १ माईक आहे असं सांगत आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत कोपरखळी मारली.
आशिष शेलार म्हणाले की, सभागृहात विरोधी पक्षनेते अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे २ माईक आहे. सभागृहातील सर्व सदस्यांचा आवाज एका माईकवर महाराष्ट्रभर पोहचतो. एका माईकवर बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, आदित्य ठाकरे एका माईकवर काम करू शकतात. मग असं काय आहे जे या ३ सदस्यांना २ माईक दिलेत असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तसेच या सदस्यांवर कुणी पाळत ठेवतंय का? या सदस्यांबाबतीत कुणाला विशेष माहिती हवीय का? हे २ माईक का आहेत. हा माझा हरकतीचा मुद्दा आहे. त्यावर माझं समाधान करावं असं शेलारांनी म्हटलं. त्यावर शेलारांना एक माईकची गरज नाही. माईकशिवाय तेवढेच इफेक्टिव आहात. आपण घेतलेल्या हरकतीची सखोल चौकशी करून हा आवाज कुठे जातोय का याबाबत माहिती घेऊ असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सांगितले. त्याचवेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रत्येकाचा १ माईकचा आवाज आमचा दिल्लीला जातोय. म्हणजे आमच्या सगळ्यांचा आवाज दिल्लीला जातोय. आमचंही ऑफिस दिल्लीलाच आहे असं सांगितल्यानं विधानसभेत हशा पिकला.
“गद्दारांना भाजपची ताट-वाटी, चलो गुवाहाटी,चलो गुवाहाटी”
पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी नव्या शिंदे-भाजपा सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून, दुसऱ्या दिवशीही सरकारवर निशाणा साधला. एकनाथ शिंदे यांनी आमदारांना घेऊन केलेल्या बंडाचे पडसाद विधिमंडळ अधिवेशनात पडताना दिसत आहेत. पहिल्या दिवशी खोके आणि ओकेवरून टोलेबाजी केल्यानंतर आता, गद्दारांना भाजपची ताट-वाटी, चलो गुवाहाटी,चलो गुवाहाटी, अशा घोषणांनी विधिमंडळ परिसर दणाणून गेल्याचे पाहायला मिळाले.