कच्चे तेल स्वस्त झाल्यानंतरही पेट्रोल-डिझेल का महागते? अशोक चव्हाण यांचा केंद्र सरकारला सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 04:40 PM2020-06-29T16:40:34+5:302020-06-29T16:51:06+5:30
पेट्रोलियम पदार्थांच्या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीवर निश्चित केल्या जातात. पण जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत घसरते, तेव्हाही भारतात पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले जातात
मुंबई - आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती स्वस्त झाल्यानंतरही भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढतात कशा, हे अनाकलनीय गणित केंद्र सरकारने देशाला समजावून सांगावे, असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. दरम्यान, पेट्रोल, डिझेलच्या सातत्याने वाढत असलेल्या दरांच्या विरोधात काँग्रेसने आज देशव्यापी आंदोलन केले.
या देशव्यापी आंदोलनात सहभागी होताना त्यांनी हे विधान केले. यासंदर्भात ते म्हणाले की, पेट्रोलियम पदार्थांच्या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीवर निश्चित केल्या जातात. पण जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत घसरते, तेव्हाही भारतात पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले जातात. तिकडे भाव कमी होणार, तरीही आपल्याकडे भाव वाढणार, हे गणित लोकांच्या समजण्यापलीकडचे आहे. त्यामुळे केंद्राने याबाबत स्पष्टीकरण देण्याची गरज आहे, असे चव्हाण म्हणाले.
पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी करण्याच्या थापा मारून सत्तेत आलेल्या भाजपच्या केंद्र सरकारने मागील सहा वर्षात केवळ सर्वसामान्य जनतेचा खिसा कापण्याचे काम केले आहे. महाराष्ट्रात आज पेट्रोलचा दर प्रती लिटर ८७ रूपये तर डिझेलचा दर ७९ रूपयांवर गेला आहे. आज क्रूड ऑईलचा एक बॅरल ४१ डॉलरला मिळतो. काँग्रेसच्या काळात एका बॅरलचा दर ११० डॉलरवर गेला होता. तरीही पेट्रोल-डिझेल इतके महागले नव्हते, असे अशोक चव्हाण पुढे म्हणाले.
भरीसभर म्हणजे भाजपच्या केंद्र सरकारने सहा वर्षात अनेकदा उत्पादन शुल्कात वाढ केली. त्याचाही मोठा फटका लोकांना बसला. गेल्या सहा वर्षात पेट्रोलवरील उत्पादन शुल्क अडीच पटींनी तर डिझेलवरील उत्पादन शुल्क आठ पटींनी वाढले. करवाढीचे हे प्रमाण समर्थनीय असू शकत नाही. कोरोनामुळे सर्वसामान्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या किंमती तातडीने कमी कराव्यात, अशी मागणीही सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली.
इतर महत्त्वाच्या बातम्या