‘स्वनाथ’ कशाला? ‘अनाथ’ गैर नाही; उच्च न्यायालयाने फेटाळली जनहित याचिका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 05:22 AM2022-09-16T05:22:25+5:302022-09-16T05:24:05+5:30
‘अनाथ’ हा शब्द बदलण्याची आवश्यकता नाही, असे म्हणत न्यायालयाने याचिका फेटाळली.
मुंबई : ‘अनाथ’ शब्दाऐवजी ‘स्वनाथ’ हा शब्द प्रचलित करावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली. यामध्ये न्यायालयाच्या हस्तक्षेपाची आवश्यकता नाही, असे न्यायालयाने म्हटले.
स्वनाथ फाऊंडेशनतर्फे ही याचिका दाखल करण्यात आली होती. ज्या मुलांनी पालक गमावले आहेत, त्यांना असुरक्षिततेच्या सामना करावा लागतो. ‘अनाथ’ हा ‘गरजू’ व ‘असुरक्षित’ मुले असे प्रतिबिंबित करतो, असा दावा याचिकेत करण्यात आला होता. त्यावर सुनावणी करताना मराठी, हिंदी आणि बंगाली भाषेत पालक नसलेल्या मुलांसाठी ‘अनाथ’ हा शब्द कित्येक वर्षांपासून वापरला जात आहे, असे निरीक्षण मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. माधव जामदार यांच्या खंडपीठाने नोंदविले.
‘अनाथ’ हा शब्द एकप्रकारे कलंक आहे, या याचिकाकर्त्याच्या मताशी आम्ही सहमत नाही. याचिकाकर्ता ज्या ट्रस्टशी संबंधित आहे, त्या ट्रस्टचे नाव बदलण्याचा प्रयत्न याचिकाकर्ता करत आहे. राज्य सरकारकडे याबाबत विचारणा करावी, अशी परिस्थिती नाही. मुळातच ‘अनाथ’ हा शब्द बदलण्याची आवश्यकता नाही, असे म्हणत न्यायालयाने याचिका फेटाळली. फाऊंडेशनतर्फे ॲड. उदय वारुंजीकर यांनी युक्तिवाद केला.
अनाथ हा शब्द पालक नसलेल्या मुलांसाठी वापरतात. त्यात अयोग्य काय? काही जनहित याचिकादार आता येतात आणि शब्द बदला, असे म्हणतात. त्यांना भाषाशास्त्र माहीत आहे का? नेहमी आमचेच (न्यायालय) मत योग्य आहे आणि प्रशासनाचे मत योग्य नाही, असे नाही. कधी कधी आम्हालाही ‘लक्ष्मणरेखा’ आखावी लागते. प्रत्येक प्रकरणात आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही, असे म्हणत न्यायालयाने यामध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला.