राहुल गांधी यांच्या पंतप्रधान पदाच्या घोषणेने इतके अस्वस्थ का होता? संजय राऊत यांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 04:16 AM2018-05-10T04:16:36+5:302018-05-10T04:16:36+5:30
राहुल गांधी यांनी पंतप्रधान होण्याबाबत भूमिका मांडली आहे. लोकशाहीत त्यांना तसा अधिकार आहे. त्यामुळे कोणी खिल्ली उडविण्याची गरज नाही. खुद्द नरेंद्र मोदीसुद्धा लोकशाहीने दिलेल्या याच अधिकारातून पंतप्रधान झाल्याचे वक्तव शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी बुधवारी केले. खरे तर त्या वेळी लालकृष्ण अडवाणी हेच पंतप्रधान व्हायला हवेत, अशीही भूमिका अनेकांनी घेतली होती, असा टोलाही राऊत यांनी हाणला.
मुंबई - राहुल गांधी यांनी पंतप्रधान होण्याबाबत भूमिका मांडली आहे. लोकशाहीत त्यांना तसा अधिकार आहे. त्यामुळे कोणी खिल्ली उडविण्याची गरज नाही. खुद्द नरेंद्र मोदीसुद्धा लोकशाहीने दिलेल्या याच अधिकारातून पंतप्रधान झाल्याचे वक्तव शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी बुधवारी केले. खरे तर त्या वेळी लालकृष्ण अडवाणी हेच पंतप्रधान व्हायला हवेत, अशीही भूमिका अनेकांनी घेतली होती, असा टोलाही राऊत यांनी हाणला.
राहुल गांधी यांनी पंतप्रधान होण्याबाबत जे वक्तव्य केले, त्यामुळे भाजपा किंवा नरेंद्र मोदी यांनी अस्वस्थ होण्याचे काही कारण नाही. राहुल यांचा पराभव करा आणि त्यांना रोखा हा त्यावरचा मार्ग आहे. आजही काँग्रेस देशात सर्वात मोठा पक्ष आहे. २०१४च्या निवडणुकीत विशिष्ट वातावरणामुळे काँग्रेसचा पराभव झाल्याचे राऊत म्हणाले. राहुल यांच्या भूमिकेवर संयुक्त पुरोगामी आघाडीतील घटक पक्ष काय तो निर्णय घेतील. आम्हाला शरद पवार लायक उमेदवार वाटतात. मोदी, जेटली, अडवाणी या प्रत्येकात क्षमता आहे. खुर्चीवर बसल्यावर सर्वांमध्ये क्षमता येते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजपा शिवसेना युतीबाबत राऊत म्हणाले की, भाजपात गोंधळ आहे. स्वबळावर निवडणूक लढवणे ही उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे. शिवसेनेच्या निर्णयावर कुणी दबाव आणू शकणार नाही. पालघरप्रमाणे गोंदिया-भंडारा मतदारसंघातील निवडणूक लढवावी, अशी शिवसैनिकांची भावना आहे. शिवसेनेला ताकद आणि स्वाभिमान दाखविण्याची ही संधी आहे. पालघरबाबत भाजपाचा निर्णय दुर्दैवी आहे. ज्यांनी वनगांविरुद्ध निवडणूक लढविली, त्यांनाच भाजपाने उमेदवारी दिली. पालघरची जागा भाजपाची असती, तर त्यांना काँग्रेसचा उमेदवार भाड्याने घेण्याची वेळ आली नसती. मुख्यमंत्र्यांना सहकार्याची अपेक्षा असेल, तर त्यांनी काँग्रेसमधून आयात केलेला त्यांचा उमेदवार मागे घ्यावो. छगन भुजबळ हे राजकीय विरोधक असले, तरी त्यांच्याशी व्यक्तिगत वैर नाही. बाळासाहेबांची साथ ज्यांनी सोडले, त्या प्रत्येकाची वाताहत झाल, असे राऊत म्हणाले़