नितेश राणे, गीता जैन यांच्यावर कारवाई करणार की नाही? हायकोर्टाचा प्रक्षोभक भाषणांवर सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 04:33 PM2024-04-08T16:33:09+5:302024-04-08T16:33:33+5:30
उच्च न्यायालयाने मुंबई आणि ठाणे पोलीस आयुक्तांना या दोघांवर कारवाई करणार की नाही, असा सवाल करत आठवड्याच्या आत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर दोन महिन्यांपूर्वी भाजपाचे आमदार नितेश राणे आणि गीता जैन यांनी प्रक्षोभक भाषण केले होते. याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर उच्च न्यायालयाने मुंबई आणि ठाणे पोलीस आयुक्तांना या दोघांवर कारवाई करणार की नाही, असा सवाल करत आठवड्याच्या आत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.
मीरा भाईंदरमध्ये राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याच्या आधी हिंसाचार झाला होता. यावरून वातावरण तापले होते. नया नगरमध्ये शोभा यात्रा काढणाऱ्यांवर हल्ला करण्यात आला होता. हल्ला करणाऱ्या 19 जणांना अटक केली होती. तसेच पालिकेने येथील अनधिकृत दुकाने, झोपड्यांवर तोडकामाची कारवाई देखील केली होती.
या दरम्यान, स्थानिक आमदार गीता जैन आणि भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी या भागात जात प्रक्षोभक भाषणे केली होती. याविरोधात मीरा रोड आणि मुंबईतील काही लोक उच्च न्यायालयात गेले होते. भाजप नेत्यांवर कारवाई करण्याची मागणी या फौजदारी याचिकेतून करण्यात आली आहे. यावर आज सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने पोलिसांना उत्तर देण्याचे आदेश दिले. तसेच पुढील सुनावणी पुढच्या सोमवारी ठेवण्यात आली आहे. यामुळे या दोन भाजप नेत्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.