राज्यसभेपेक्षा अधिक मतांनी भाजप निवडून येणार, अजित पवारांच्या भेटीनंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 01:24 PM2022-06-20T13:24:22+5:302022-06-20T13:24:45+5:30
भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे अजित पवारांच्या भेटीला गेले होते. यातच आमदार रवी राणा विधान भवनात पोहोचले आहेत.
मुंबई - राष्ट्रवादीने आपल्या पाच महत्वाच्या नेत्यांची मते मागे ठेवलेली असताना भाजपा नेते आणि फडणवीसांच्या काळातील महत्वाचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. विधानपरिषदेची निवडणूक रंगात असतानाच झालेल्या या भेटीमुळे चर्चांना उधाण आलं आहे. दुसरीकडे विधिमंडळात देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस नेत्यांचीही आमने-सामने भेट झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र, अजित पवारांच्या भेटीनंतरही बावनकुळे यांनी केलेल्या विधानाची आता चर्चा होत आहे.
भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे अजित पवारांच्या भेटीला गेले होते. यातच आमदार रवी राणा विधान भवनात पोहोचले आहेत. यामुळे बावनकुळे हे नेमके कशासाठी अजित पवारांना भेटण्यासाठी गेले याची चर्चा होत होती. अजित पवार, एकनाथ खडसे आणि बावनकुळेंमध्ये चर्चा झाल्याचे समजते. दरम्यान, बावनकुळेंनी अजित पवार यांची भेट घेऊन परतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी, भाजप उमेदवार राज्यसभेच्या निवडणुकीपेक्षा अधिक मतं घेऊन आमदार बनणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. फडणवीस मुख्यमंत्री असताना ते सर्वांसाठी उपलब्ध असायचे. आताचे मुख्यमंत्री कुठे असतात, कोणाला भेटतात. यामुळे आमदारच त्याचा बदला घेतील असे बावनकुळे म्हणाले. बावनकुळेंच्या या प्रतिक्रियेमुळे अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत.
दरम्यान, विधान परिषद निवडणुकीत दुपारी १ वाजेपर्यंत २४६ आमदारांनी मतदान केले आहे. भाजपाने १०४ हून अधिक आमदारांचे मतदान झाले आहे. तर राष्ट्रवादीने देखील आपल्या आमदारांचे मतदान पार पाडले आहे. परंतू, पाच महत्वाचे नेते मागे राहिल्याने ही नेमकी खेळी कशासाठी याबाबत चर्चांना उधाण आले आहे.