Sameer Wankhede: मोठी बातमी! मुंबईत हायकोर्टातून समीर वानखेडेंना दिलासा; तुर्तास कारवाई टळली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 03:54 PM2021-10-28T15:54:11+5:302021-10-28T16:05:46+5:30
Mumbai high Court on Sameer Wankhede petition: नवाब मलिक यांच्याकडून सातत्याने सुरु असलेल्या आरोपाविरोधात समीर वानखेडे(Sameer Wankhede) यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
मुंबई – क्रुझ ड्रग्ज पार्टीवरील छापेमारीत अभिनेता शाहरुख खानचा(Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानला अटक केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिकांनी(Nawab Malik) NCB तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरुद्ध आरोपांची मालिका सुरु केली आहे. समीर वानखेडे यांनी बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी बळकावली. दहशत पसरवून भ्रष्टाचार केला असे विविध आरोप मलिकांनी वानखेडेंवर लावले होते.
नवाब मलिक यांच्याकडून सातत्याने सुरु असलेल्या आरोपाविरोधात समीर वानखेडे(Sameer Wankhede) यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मलिकांनी जे आरोप केलेत ते गंभीर असल्याने राज्य सरकारकडून समीर वानखेडेंविरोधात चौकशी करण्यासाठी समिती नेमली आहे. मात्र चौकशी करायची असेल तर CBI कडून करण्यात यावी अशी मागणी समीर वानखेडेंनी उच्च न्यायालयात केली आहे. यावर हायकोर्टाने(Mumbai High Court) समीर वानखेडेंना दिलासा दिला आहे.
तुर्तास समीर वानखेडेंविरोधात कुठलीही कारवाई करण्यास हायकोर्टाने मनाई केली आहे. आरोपांमध्ये काही दोष आढळल्यास कारवाई करायची असेल तर त्यांना ३ दिवसांची नोटीस द्यावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांना दिला आहे. त्यामुळे समीर वानखेडेवर कारवाई करताना राज्य सरकारच्या यंत्रणांना ३ दिवस वाट पाहावी लागेल. समीर वानखेडे यांच्याविरोधात ४ पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. या आरोपांची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद खेतले, पोलीस निरीक्षक अजय सावंत, सहाय्य पोलीस निरीक्षक श्रीकांत कारकर आणि पोलीस उपनिरीक्षक प्रकाश गवळी असं या अधिकाऱ्यांची नावं आहेत.
समीर वानखेडे ‘धर्म’संकटात!
मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा निकाहनामा ट्विटद्वारे जारी केला. या दाव्याच्या पुष्ट्यर्थ मौलाना मुझम्मील अहमद यांनी २००६ मध्ये समीर यांच्या पहिल्या निकाहाचा हवाला दिला. मुझम्मील म्हणाले की, निकाहावेळी समीर वानखेडे आणि शबाना हे दोघेही मुस्लीम होते. समीर मुस्लीम नसते तर त्यांचा निकाहच लावला नसता. कारण शरियतनुसार असा निकाह होत नाही आणि शरियतविरोधात जाऊन काझी निकाह लावत नाहीत असं त्यांनी सांगितले.
मी हिंदूच...
मलिकांनी केलेल्या दाव्यानंतर या वादावर उत्तर देताना आपण जन्माने हिंदू असून आताही हिंदूच असल्याचे समीर वानखेडे यांनी स्पष्ट केले. पहिल्या लग्नाविषयी ते म्हणाले की, माझी आई मुस्लीम होती. तिच्या इच्छेनुसार इस्लामी पद्धतीने लग्न केले. आईने वडिलांशी लग्नानंतर हिंदू धर्माचा स्वीकार केला होता. आईच्या इच्छेनुसार इस्लामी पद्धतीने लग्न केल्यानंतर विशेष विवाह कायद्यानुसार विवाह नोंदणी केली म्हणजे काही गुन्हा झाला का, असा प्रश्नही वानखेडे यांनी केला होता.