"राहुल गांधींसाठी माझ्या खर्चाने थेअटर बुक करेन"; सिनेमासाठी फडणवीसांचं निमंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 10:01 PM2024-03-30T22:01:47+5:302024-03-30T22:04:50+5:30
काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी माफीवीर म्हणत स्वातंत्र्यवीर सावरकरांवरुन भाजापावर टीका केली होती.
मुंबई - विनायक दामोदर सावरकर म्हणजे वीर सावरकर यांच्या आयुष्याचा स्वातंत्र्यसंग्राम ७० मिमि पडद्यावर झळकवण्याचं काम अभिनेता आणि दिग्दर्शक रणदीप हुडा याने केलं आहे. २२ जानेवारी रोजी 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपट देशभरात प्रदर्शित झाला. मात्र, महाराष्ट्रपुत्र असलेल्या वीर सावकरांचा जीवनपट मराठी भाषेतही प्रदर्शित करण्यात येत आहे. त्यासाठी, भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनींगसाठी हजेरी लावली. यावेळी, अभिनेता रणदीप हुडा आणि अंकिता लोखंडे दोघेही उपस्थित होते. यावेळी, पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीसांनी राहुल गांधींना चित्रपट पाहण्याचं निमंत्रण दिलंय.
काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी माफीवीर म्हणत स्वातंत्र्यवीर सावरकरांवरुन भाजापावर टीका केली होती. भारत जोडो यात्रेत आल्यानंतर राहुल गांधींनी सावरकरांचे नाव घेत टीका केल्याने भाजपाने संताप आंदोलन केले होते. आता, वीर सावरकर यांचा जीवनपट या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर उलगडण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात २२ मार्चला 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. हिंदीबरोबरच मराठीतही हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. आजपासून 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा मराठीतून प्रदर्शित झाला. त्यासाठी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सिनेमागृहात हजेरी लावली होती. त्यावेळी, पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना राहुल गांधींसाठी मी संपूर्ण थेअटर बुक करतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
🕗 8pm | 30-3-2024 📍 Mumbai | रा. ८ वा. | ३०-३-२०२४ 📍 मुंबई .
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) March 30, 2024
LIVE | Media interaction.#Mumbai#Maharashtrahttps://t.co/xd4Ye0269w
महाराष्ट्रातील प्रत्येकाने हा चित्रपट पाहावा, आपल्या स्वातंत्र्यसंग्रामातील खऱ्या हिरोचं आयुष्य या चित्रपटातून उलगडलं आहे, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी चित्रपट पाहण्याचं आवाहन केलं आहे. त्यावेळी, राहुल गांधींना चित्रपट पाहायचा असेल तर तुम्ही तिकीट काढून देणार का, असा प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला होता. त्यावरही, फडणवीसांनी मजेशीर उत्तर दिले. राहुल गांधींनी हा चित्रपटा पाहावा, मी त्यांच्यासाठी माझ्या स्वत:च्या खर्चाने थेअटर बुक करुन देतो, असे फडणवीसांनी म्हटले.
दरम्यान, गेल्या आठवड्यात २२ मार्चला 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. हिंदीबरोबरच मराठीतही हा सिनेमा प्रदर्शित होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाला मिळालेल्या प्रतिसादानंतर आता मराठीत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आज शुक्रवार २९ मार्चपासून 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा मराठीतून प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे आता मराठीत स्वातंत्र्याचा वीर इतिहास उलगडला आहे.