काँग्रेसचे मंत्री काम करणार की वाद तयार करणार?, हे सरकार आहे की सिनेमा?

By अतुल कुलकर्णी | Published: January 29, 2020 05:12 AM2020-01-29T05:12:58+5:302020-01-29T05:15:01+5:30

त:च्या खात्यांशिवाय भलत्याच राजकीय कारणावरुन रोज नवे वाद ओढवून घेण्यातच गर्क आहेत.

Will the Congress minister work or create controversy? Is it government or cinema? | काँग्रेसचे मंत्री काम करणार की वाद तयार करणार?, हे सरकार आहे की सिनेमा?

काँग्रेसचे मंत्री काम करणार की वाद तयार करणार?, हे सरकार आहे की सिनेमा?

Next

- अतुल कुलकर्णी

मुंबई : काँग्रेसला राज्यात विरोधी पक्षनेता बनवण्याइतक्याही जागा मिळाल्या नाहीत. निवडून आलेल्या ४४ आमदारांपैकी १२ आमदारांना मंत्रीपदे व एकास विधानसभेचे अध्यक्षपद मिळाले. तरीही काँग्रेसचे मंत्री कामाला लागल्याचे चित्र दिसत नाही. स्वत:च्या खात्यांशिवाय भलत्याच राजकीय कारणावरुन रोज नवे वाद ओढवून घेण्यातच गर्क आहेत.

सुरुवातीच्या काळात आवडीची खाती हवीत म्हणून, नंतर आवडीचे बंगले आणि कार्यालयासाठी कुरबुरी करणाऱ्या काँग्रेस मंत्र्यांच्या वागण्याने पक्षाची प्रतीमाही मलिन होऊ लागली आहे. शिवसेना आणि राष्टÑवादीच्या मंत्र्यांनी त्यांना मिळालेल्या विभागांच्या बैठका घेणे, निर्णय घेणे सुरु केलेले असताना काँग्रेस मंत्र्यांच्या गोटात सामसूम आहे. सामंजस्याने सरकार चालवा, वाद होऊ देऊ नका, हा काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांचा सल्ला पाळताना दिसत नाहीत. उलट शिवसेनेचे मंत्री त्यांचा स्वभावधर्माला मूरड घालत दाखवलेला समजूतदारपणा कोड्यात टाकणारा आहे.

महाराष्टÑात तीन पक्षांचे सरकार सत्तेवर आले. काँग्रेस, व राष्टÑवादीची विचारधारा एकच असताना शिवसेनेने स्वत:च्या विचारधारेला मूरड घालत किमान समान कार्यक्रमावर महाविकास आघाडी स्थापन करण्यास सहमती दिली. शिवसेनेने होकार दिला म्हणून काँग्रेस आणि राष्टÑवादी सत्तेत सहभागी होऊ शकली. मात्र आमचा सुपरहिट सिनेमा आहे, आमचा मल्टीस्टार सिनेमा आहे अशी विधाने सुरु केली आहेत. त्यामुळे हे सरकार आहे की सिनेमा असा प्रश्न पडावा अशी परिस्थीती आहे.

हे सरकार म्हणजे सुपरहिट सिनेमा आहे असे खा. संजय राऊत म्हणाले. तर बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सध्याचा जमाना मल्टीस्टार चित्रपटाचा आहे. आमचे तीन पक्षाचे सरकार आहे. आमच्याकडे तीन तीन हिरो आहेत असे विधान केले. या सरकारमध्ये हिरोचे पद म्हणजे मुख्यमंत्रीपद एकच आहे. ते शिवसेनेचे नेते उध्दव ठाकरे यांच्याकडे आहे. राष्टÑवादीचे अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळे ते दोन नंबरचे हिरो असतील तर काँग्रेसकडून हिरो कोण? बाळासाहेब थोरात की अशोक चव्हाण? खरगे यांनी थोरात पक्षाचे प्रमुख असतील असे स्पष्ट केल्यानंतरही हा वाद संपलेला नाही.

सरकार किमान समान कार्यक्रमावर चालेल असे आपण शिवसेनेकडून लिहून घेतले होते असे विधान अशोक चव्हाण यांनी केले मात्र हा समान किमान कार्यक्रम तयार करताना ज्या बैठका झाल्या त्यातल्या एकाही बैठकीला चव्हाण हजर नव्हते. दिल्लीत शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीच्या वेळीही ते नव्हते. उध्दव ठाकरे व अजित पवार यांनी शपथ घेण्याच्या आधी हा कार्यक्रम पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला गेला. त्यावेळीही चव्हाण नव्हते. मग त्यांनी शिवसेनेकडून कधी लिहून घेतले? शिवसेनेने त्यांना जे लिहून दिले ते राष्टÑवादीला का दिले नाही? असे प्रश्न त्यांच्या बोलण्यातून पुढे आले आहेत.

असले राजकीय वाद महाविकास आघाडीला बदनामीच्या उंबरठ्यावर नेणारे आहेत. त्या उलट मंत्र्यांनी त्यांचे विभाग, त्यांचा आढावा, त्यातून जनतेसाठी काय करणार, याची माहिती द्यायला हवी. राज्यात चांगला रस्ता दाखवा आणि बक्षीस मिळवा अशी अवस्था आहे. यावर कोणते उपाय करणार? चांगल्या रस्त्यासाठी काय नियोजन करणार? यावर चव्हाणांनी बोलायला हवे. उलट वीस वर्षे झाल्यावरही उड्डाण पूल आणि रस्त्यांसाठी आजही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव लोक घेतात. ते नाव पूसून स्वत:ची वेगळी छाप पाडण्याची संधी बांधकाम विभागाच्या माध्यमातून अशोक चव्हाण यांना मिळालेली आहे. त्याचे सोने करायला हवे. हे असले वाद निर्माण करण्याचा त्यांचा आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा स्वभाव नाही. तरीही या दोन्ही नेत्यांच्या बोलण्यामुळे सतत वाद का होत आहेत? की अशा वादातून त्यांना स्वत:साठी राजकीय ‘स्पेस’ तयार करायची आहे, पण ती कशी हे तेच सांगू शकतील.

Web Title: Will the Congress minister work or create controversy? Is it government or cinema?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.