रक्षाबंधनादिवशी खासदार सुप्रिया सुळेंना भेटणार का? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी थेटच सांगितलं; म्हणाले,...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 02:59 PM2024-08-15T14:59:08+5:302024-08-15T15:09:04+5:30
Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्याचे पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह काही नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत मंत्रिपदाची शपथ घेतली.
Ajit Pawar ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्याचे पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह काही नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत मंत्रिपदाची शपथ घेतली. तेव्हापासून राष्ट्रवादीत संघर्ष पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली. यामुळे पवार कुटुंबातच फूट पडल्याची जोरदार चर्चा सुरू होती. दरम्यान, गेल्या वर्षी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचे रक्षाबंधानाचे फोटो समोर आले नव्हते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होते. आता या वर्षी सुळे यांची रक्षाबंधनाला भेट घेणार का? या चर्चेवर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
मोठी बातमी: बारामतीतून लढण्यास मला फार रस नाही; अजित पवारांनी दिले जय पवारांच्या उमेदवारीचे संकेत
या वर्षी रक्षाबंधनाला उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार सुप्रिया सुळे यांना भेटतील अशं काहीसं चित्र आहे. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, माझा महाराष्ट्राचा दौरा सुरू आहे. त्या दौऱ्यात मी ज्या शहरात असेन तिथल्या बहिणींना भेटण्याचा प्रयत्न करणार आहे. तिथं जर सुप्रिया असेल तर तिहलाही भेटणार आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडूनही यावर प्रतिक्रिया आली आहे, खासदार सुळे म्हणाल्या, मी रक्षाबंधनादिवशी नाशिक दौऱ्यावर आहे, आधी लग्न कोंढाण्याचं. माझा कार्यक्रम ठरला आहे. ते कुठे आहेत मला माहित नाही. राखी बांधणार की नाही हे तुम्हाला कळेलच, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
ऑक्टोंबरमध्ये विधानसभा निवडणुका
दरम्यान, राज्यात काही दिवसातच विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहेत. ऑक्टोंबरमध्ये विधानसभांसाठी मतदान होऊ शकतं. यामुळे आता राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटांनी यात्रा सुरू केल्या आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जनसन्मान यात्रा सुरू केली आहे, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने शिवस्वराज्य यात्रा सुरू केली आहे.
अजित पवारांनी दिले जय पवारांच्या उमेदवारीचे संकेत
"जय पवार यांच्या उमेदवारीची मागणी त्यांच्या समर्थकांकडून केली जात आहे. त्यांना उमेदवारी देणार का?" असा प्रश्न पत्रकारांकडून विचारण्यात आला होता. त्यावर अजित पवार म्हणाले की, "शेवटी लोकशाही आहे. मीही बारामतीतून सात ते आठ वेळा निवडणूक लढवली असल्याने मला आता तिथून लढण्यास फार रस नाही. जय पवार यांना उमेदवारी देण्याकडे जनतेचा कल असेल तर पक्षाच्या पार्लामेंट्री बोर्डाकडून तोही विचार केला जाईल," असं अजित पवारांनी म्हटलं आहे.