नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षांनंतर राजकारणातून निवृत्त करणार का?: रमेश चेन्नीथला यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 06:31 AM2024-05-14T06:31:19+5:302024-05-14T06:32:41+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही त्याच नियमानुसार ७५ वर्षे झाल्यानंतर राजकारणातून निवृत्त करून अमित शाह यांना पंतप्रधान करणार का? या प्रश्नाचे उत्तर भाजपने द्यावे, अशी मागणी रमेश चेन्नीथला यांनी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : भाजपने ७५ वर्षे वय झालेल्यांना सक्रिय राजकारणातून बाजूला केले आहे. भाजपला मजबूत करणारे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी व मुरली मनोहर जोशी यांनाही ७५ वर्ष वयाचे कारण देऊन राजकारणातून बाजूला केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही याच नियमानुसार ७५ वर्षे झाल्यानंतर राजकारणातून निवृत्त करून अमित शाह यांना पंतप्रधान करणार का? या प्रश्नाचे उत्तर भाजपने द्यावे, अशी मागणी काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केली आहे.
टिळक भवन येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना चेन्नीथला म्हणाले की, मोदी त्यांच्या भाषणात हिंदू - मुस्लीम, पाकिस्तान हे मुद्दे घेऊन धार्मिक विभाजन करण्याचा प्रयत्न करत आहेत. पश्चिम बंगालमध्ये मुस्लीम लोकसंख्या वाढली आहे, असे मोदी प्रचार सभेत म्हणाले. धार्मिक विभाजनाची भाषा करणे देशाच्या पंतप्रधानाला शोभत नाही. यातून जगात काय संदेश जातो, असा सवाल त्यांनी उपस्थित करत १० वर्षांत सरकारने काय काम केले, त्यावर मोदी बोलत नाहीत, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मुंबईतील बीकेसी मैदानावर शुक्रवार, १७ मे रोजी इंडिया आघाडीची जाहीर सभा होणार आहे. या सभेला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, उद्धव ठाकरे व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार आहेत. तसेच १८ मे रोजी इंडिया आघाडीची पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती चेन्नीथला यांनी दिली.