"... तर अजिबात खपवून घेणार नाही"; पुतण्या रोहित यांचं अजित पवारांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2023 10:11 AM2023-12-02T10:11:15+5:302023-12-02T10:12:24+5:30

आता रोहित पवार यांनीही पलटवार केला आहे. 

"... will not tolerate it at all"; Nephew Rohit Pawar's reply to Ajit Pawar on sangharsh Yatraa | "... तर अजिबात खपवून घेणार नाही"; पुतण्या रोहित यांचं अजित पवारांना प्रत्युत्तर

"... तर अजिबात खपवून घेणार नाही"; पुतण्या रोहित यांचं अजित पवारांना प्रत्युत्तर

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जतमधील शिबीर अपेक्षाप्रमाणे उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या भाषणाने गाजले. आपल्या भाषणात अजित पवारांनी आतल्या गोष्टी सांगत अनेक गौप्यस्फोट केले. तर, पत्रकार परिषद घेऊनही काहींवर हल्लाबोल केला. दरम्यान, आपल्या भाषणात अजित पवारांनी नाव न घेता थेट रोहित पवार यांना लक्ष्य केलं. रोहित पवार यांनी दसऱ्याच्या दिवशी सुरू केलेल्या संघर्ष यात्रेवर अजित पवारांनी जोरदार वार केला. आता, काकांचा वार सहन न झाल्याने पुतण्यानेही पलटवार केला आहे. रोहित पवार यांनी एकप्रकारे अजित पवारांनाच दम भरलाय.  

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आव्हान देत सत्तेत सहभाग घेतला. त्यानंतर, प्रथमच पक्षाच्या राज्यव्यापी शिबिरातील भाषणात अनेक गौप्यस्फोट करत राजकीय खळबळ उडवून दिली. आम्ही सत्तेत सहभागी होण्यासाठी आधी शरद पवार यांची सहमती होती, मात्र नंतर त्यांनी भूमिका बदलली, असा आरोप अजित पवारांनी केला. आपल्या भाषणातून त्यांनी शरद पवार गटाच्या इतर नेत्यांवरही हल्लाबोल केला. पुतण्या आणि शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर पहिल्यांदाच जाहीरपणे टीका करण्यात आली. काही लोक गुडघ्याला बाशिंग बांधून फिरत आहेत, असं ते म्हणाले. ज्यांनी आयुष्यात कधी संघर्ष केला नाही, ते संघर्ष यात्रा काढत आहेत, असा जबरी टोला अजित पवार यांनी लगावला होता. त्यावर, आता रोहित पवार यांनीही पलटवार केला आहे. 

आदरणीय दादा, युवांच्या मागण्यांसाठी आम्ही सर्व युवा पुणे ते नागपूर असा 800 किमीचा पायी प्रवास करत असून नागरिकांशी संवाद साधत आम्ही आतापर्यंत 500 किमीचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे.आपल्या नजरेत आमचा हा संघर्ष लहान असला तरी ज्या मागण्यांसाठी आम्ही संघर्ष करत आहोत, त्या मागण्या अत्यंत महत्वाच्या असून लाखो युवांच्या भविष्याशी निगडित आहेत आणि याच मागण्यांसाठी भविष्यात मोठ्या संघर्षाची देखील आमची तयारी आहे, अशा शब्दात रोहित यांनी अजित पवारांवर पलटवार केला आहे. 

युवांच्या, सर्वसामान्यांच्या प्रश्नांना घेऊन चाललेल्या युवा संघर्ष यात्रेकडे राजकीय टीकेसाठी का होईना आपले लक्ष गेलेच आहे तर युवकांचे जे मुद्दे आम्ही घेऊन चाललो आहोत त्यांच्याकडेही थोडे लक्ष द्या. आपण माझ्यावर काहीही टीका करा, टीका मी पचवून घेईल. परंतु, युवांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर अजिबात खपवून घेणार नाही, असं प्रत्युत्तरही रोहित पवार यांनी काका अजित पवारांना दिलं आहे. तसेच, तुमची कार्यक्षमता आणि तळमळ महाराष्ट्राने याआधीही पाहिली आहे, भाजपसोबत गेलात म्हणून ती कार्यक्षमता आणि तळमळ कमी झाली असल्याच्या चर्चा असल्या तरी युवांचे प्रश्न मार्गी लावून आपली खरी ताकद पुन्हा एकदा दाखवून द्यावे, असे आवाहनही केले आहे.  

रोहित पवार अन् आव्हाड लक्ष्य

दसऱ्याच्या मुहूर्तावर पुण्यावरून निघालेली रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा येत्या १२ डिसेंबरला नागपूरला धडकणार आहे. या यात्रेवरून नाव न घेता अजि पवारांनी रोहित पवारांवर टीका केली. "काहीजण आता गुडघ्याला बाशिंग बांधून संघर्ष यात्रा काढत आहेत. अरे कसला संघर्ष? कधी आयुष्यात संघर्ष केला नाही आणि आता कशाचा संघर्ष?" असा खोचक सवाल करत त्यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला. तसंच यावेळी जितेंद्र आव्हाडांनाही त्यांनी डिवचलं. "मागे एकदा आमचे वरिष्ठ पावसात भिजले होते, तसं आता त्यांचा एक सहकारीही पावसात भिजला, अरे कशासाठी?  त्याच्यावर एकदा हल्ला झाला होता, तेव्हा मीच आधार द्यायला गेलो होतो. मी सगळ्यांच्या पाठीशी उभा राहिलो, कारण आपल्यात तशी हिंमत आहे," असं अजित पवार म्हणाले.
 

Web Title: "... will not tolerate it at all"; Nephew Rohit Pawar's reply to Ajit Pawar on sangharsh Yatraa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.