शिवसेना राज्यसभेत विरोधी बाकांवर बसणार?; संजय राऊत म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 06:49 PM2019-11-16T18:49:36+5:302019-11-16T18:52:47+5:30
भाजपा- शिवसेनेकडून युतीची तोडण्याची अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
मुंबई: भाजपा व शिवसेनेमध्ये राज्यात सत्तास्थापनेवरुन वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेनं काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत सत्तास्थापनेबाबत चर्चा सुरु केली आहे. भाजपा- शिवसेनेकडून युतीची तोडण्याची अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता राज्यसभेत भाजपासोबत बसणारे शिवसेनेचे खासदार आता विरोधकांच्या बाकांवर बसणार असल्याचे बोलले जात आहे.
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना याबाबत विचारले असता राज्यसभेत असलेले शिवसेनेच्या दोन खासदारांची बसण्याची व्यवस्था बदलण्यात आल्याचे आम्हाला कळले आहे असं त्यांनी सांगितले. राज्यसभेत शिवनेचे संजय राऊत व अनिल देसाई हे दोन खासदार आहेत.
Sanjay Raut, Shiv Sena: We have got to know that the seating arrangement of two Shiv Sena MPs has been changed in the Parliament. https://t.co/vOKQ8p1pT9pic.twitter.com/KGPGS60y4R
— ANI (@ANI) November 16, 2019
संसदेचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून (१८ नोव्हेंबर) सुरू होत आहे. तत्पूर्वी शिरस्त्याप्रमाणे रालोआतील घटकपक्षांची बैठक होते. भाजपकडून शिवसेना, शिरोमणी अकाली दल, संयुक्त जनता दल, अपना दल, लोकजनशक्ती पक्षाला बैठकीचे निमंत्रण पाठवले जाते. अधिवेशनापूर्वी होणारी ही बैठक अनौपचारिक असली तरी त्यास राजकीयदृष्ट्या महत्त्व आहे. बैठकीत अधिवेशनातील रणनिती, विविध विषय, परस्पर सामंजस्य, सहमतीवर चर्चा होते. शिवसेना पक्ष नियमितपणे या बैठकीत सहभागी होत असे. गेल्या तीस वर्षात पहिल्यांदाच शिवसेनेला अद्याप निमंत्रण पाठवण्यात आले नसल्याचे अरविंद सावंत यांनी सांगितले होते.
शिवसेनेचे मोदी सरकारमधील एकमेव मंत्री असलेल्या अरविंद सावंत यांनी आज आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. भाजपा आणि भाजपाच्या नेत्यांनी दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळे विश्वासार्हतेला तडा गेला आहे. आता राज्यात नव्या आघाडीसह शिवसेनेचे सरकार बनत आहे. अशा परिस्थितीत केंद्रात मंत्री म्हणून काम करणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याचे अरविंद सावंत यांनी सांगितले होते.