कोणते पक्ष रिकामे होतात हे लवकरच कळेल, मुख्यमंत्र्यांचा अजित पवारांना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 05:08 PM2018-12-13T17:08:45+5:302018-12-13T17:23:50+5:30
देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाचा पराभव झाल्याने महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीतील नेत्यांमध्ये नवचैतन्य संचारलं आहे
मुंबई - आगामी 2019 च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक भाजपा नेते अन् आमदार राष्ट्रवादी काँग्रेसध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. याबाबत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही वृत्ताला दुजोरा दिला होता. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 'लोकमत नॅशनल कॉन्ल्केव्ह' दिल्ली येथील कार्यक्रमात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, येणाऱ्या काळच या प्रश्नाचे उत्तर देईल. कोणते पक्ष रिकामे होतात, हे लवकरच कळेल, असे म्हणत फडणवीस यांनी अजित पवारांंना इशारा दिला आहे.
देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाचा पराभव झाल्याने महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीतील नेत्यांमध्ये नवचैतन्य संचारलं आहे. विशेष म्हणजे याचा महाराष्ट्रातील भाजपाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. भाजपाचे अनेक आमदार आणि नेते आमच्या संपर्कात असल्याचं विधान राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले नेते परत घरवापसी करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 'लोकमत नॅशनल कॉन्ल्केव्ह' दिल्ली येथील कार्यक्रमात प्रश्न विचारण्यात आला होता. आपल्या पक्षातील नेते राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा आहे, याबाबत काय सांगाल ? त्यावर फडणवीस यांनी गुगली टाकली आहे.
आगामी काळात कुठल्या पार्ट्या रिकाम्या होतात ते पाहा, येणाऱ्या काळात कुठल्या पक्षातून कुठले नेते कुठे जातात हे लवकरच दिसेल, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. म्हणजेच, एकप्रकारे राष्ट्रवादी अन् काँग्रेसचेच नेते भाजपाच्या संपर्कात असल्याचा सूचक इशारा फडणवीस यांनी दिला आहे. त्यामुळे फडणवीसांच्या या उत्तराने राष्ट्रवादीचीच डोकेदुखी वाढणार असल्याचे दिसून येते.