अमोल कीर्तिकर यांच्या मागे खंबीरपणे उभे राहणार; उत्तर पश्चिम जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत निर्णय
By मनोहर कुंभेजकर | Published: March 31, 2024 06:06 PM2024-03-31T18:06:53+5:302024-03-31T18:07:08+5:30
जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रमुख नेत्यांची बैठक काल दुपारी माजी मंत्री सुरेश शेट्टी यांच्या अंधेरी पूर्व कोलडोंगरी येथील कार्यालयात पार पडली.
मुंबई- उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघातून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे काँग्रेसचे नेते,माजी खासदार संजय निरुपम नाराज आहे.मी आणि माझे कार्यकर्ते कीर्तिकर यांचा प्रचार करणार नाही.काँग्रेस नेतृत्वाने या उमेदवारीचा फेरविचार करावा.अन्यथा मी माझी भूमिका जाहिर करेन असा इशारा त्यांनी दिला होता.
त्यामुळे गेल्या पंधरा दिवसापासून घडलेत असलेल्या संजय निरूपम यांच्या प्रकरणावर चर्चा करण्यासाठी उत्तर पश्चिम जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रमुख नेत्यांची बैठक काल दुपारी माजी मंत्री सुरेश शेट्टी यांच्या अंधेरी पूर्व कोलडोंगरी येथील कार्यालयात पार पडली.
यावेळी माजी मंत्री सुरेश शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे चिटणीस महेश मलिक,माजी आमदार बलदेव खोसा,माजी आमदार अशोकभाऊ जाधव,प्रदेश काँग्रेस सरचिटणीस राजेश शर्मा, भावना जैन, मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष अखिलेश यादव, मुंबई युवक कार्याध्यक्ष सोफियान हैदर,काँग्रेसचे प्रवक्ते युवराज मोहिते,मुंबई आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष सुनिल कुमरे, चंगेज मुलतानी आदी उत्तर पश्चिम जिल्हाचे प्रमुख नेते उपस्थित होते.
याबाबत महेश मलिक यांनी लोकमतला सांगितले की,संजय निरुपम म्हणजे काही काँग्रेस पक्ष नाही. जर एखाद्या व्यक्तीला पक्षाची ध्येय धोरणे पाळायची नसतील तर ती त्याची वैयक्तीक इच्छा आहे. मात्र उत्तर पश्चिम मुंबईचे काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या मागे खंबीरपणे उभे राहून त्यांच्या प्रचारात हिरीरीने सहभागी होतील.त्यांचा प्रचार सुरळीत पार पाडण्यासाठी सुरेश शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. महाविकास आघाडीच्या किंवा पक्षाच्या हितापेक्षा वैयक्तिक स्वार्थ असणारे निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्ते नसल्याचे मलिक यांनी स्पष्ट केले.
या बैठकीत कोण कोण पदाधिकारी निरुपम सोबत काँग्रेस पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत याचा आढावा घेण्यात आला. आपल्या आपल्या कार्यकर्त्यांना समजावून काँग्रेसची बाजू पटवून द्यावे, उपस्थित नेत्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत संपर्क करावा असे या बैठकीत ठरले.