मोठी बातमी! बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिवशी उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2023 04:49 PM2023-01-22T16:49:17+5:302023-01-22T16:54:37+5:30
या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आमंत्रित सर्वांनी उपस्थित राहून बाळासाहेब ठाकरेंना विधिमंडळातर्फे मानवंदना राहावी असं आवाहन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले.
मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात त्यांचे तैलचित्र लावण्यात येणार आहे. विधिमंडळाकडून होणाऱ्या या कार्यक्रम सोहळ्याची सध्या जय्यत तयारी सुरू आहे. विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ठाकरे कुटुंबातील व्यक्तीही उपस्थित राहणार असल्याचं पुढे आले आहे.
या कार्यक्रमाबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, या कार्यक्रमासाठी राज्यातील केंद्रात असणारे मंत्री, राज्याचे मंत्री, आमदार, खासदार यांना आमंत्रण दिले आहे. त्याचसोबत बाळासाहेब ठाकरेंसोबत काम केलेले कला, क्रिडा क्षेत्रातील मान्यवर हजर असतील. ठाकरे कुटुंबातील सर्व सदस्यांना आमंत्रण दिले आहे. मी स्वत: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि इतर सदस्यांशी बोललो आहे. हा कार्यक्रम विधिमंडळाकडून हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आमंत्रित सर्वांनी उपस्थित राहून बाळासाहेब ठाकरेंना विधिमंडळातर्फे मानवंदना राहावी असं आवाहन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले.
त्याचसोबत सन्मानाने योग्यरित्या प्रोटोकॉल पाळून सर्वांना योग्य स्थान दिले आहे. या कार्यक्रमात जितके नेते व्यासपीठावर असतील त्यांची भाषणे होतील. बाळासाहेब ठाकरेंसोबत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी काम केले आहे. सिनेमात बाळासाहेब ठाकरेंची भूमिका साकारली ते अभिनेते नवाजुद्दीन सिद्धिकी यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं.
संजय राऊतांना टोला
संजय राऊतांनी किंवा इतर कुणीही असतील विधिमंडळाचा कार्यक्रम काय असतो याची त्यांना जाणीव आहे. १५-२० वर्ष ते संसदीय सदस्यपदावर आहेत. विधिमंडळाच्या कार्यक्रमाला कुणी राजकीय रंग देत असतील तर ते दुर्दैवी आहे. विधिमंडळाच्या प्रतिमेला छेद देण्याचं काम केले जातेय अशा शब्दात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी संजय राऊतांना फटकारलं.
दरम्यान, हा विधिमंडळाचा कार्यक्रम आहे. राज्यातील २८८ विधानसभा आमदार, ७८ विधान परिषदेचे आमदार यांच्यावतीने हा कार्यक्रम होतोय. याचा अर्थ अखंड महाराष्ट्राकडून होणाऱ्या या कार्यक्रमावर राजकीय आरोप करून कुठेतरी या कार्यक्रमाची उंची कमी करताय हे करणे योग्य नाही. आपण सर्वांनी एकत्र येऊन बाळासाहेबांना मानवंदना देऊया असंही ते म्हणाले.