विम्बल्डनला प्रेक्षक मास्कविना; देशात ही स्थिती केव्हा पाहायला मिळणार? : उच्च न्यायालय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 06:17 AM2021-07-14T06:17:23+5:302021-07-14T06:18:59+5:30
Coronavirus In India : आपल्या देशात अशी स्थिती कधी येणार? न्यायालयाचा प्रश्न. जनहित याचिकांच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाचे प्रश्न.
मुंबई : गेल्या आठवड्यात विम्बल्डन येथे झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात नोव्हाक जोकोविचवर सर्वांच्या नजर खिळल्या असतील. मात्र, यावेळी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नजर होती ती मास्क न घालता स्टेडियमवर उपस्थित असलेल्या प्रेक्षकांवर. या सामन्यावेळी नोव्हाकची खेळी पाहताना न्यायाधीशांच्या डोक्यात मात्र वेगळा विचार सुरू होता. आपल्या देशात लोक केव्हा मास्कविना सार्वजनिक ठिकाणी वावरतील? आपला देश कधी ‘नॉर्मल’ स्थितीत येणार? प्रत्येकाचे लसीकरण करणे, हीच चावी आहे, असे मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने म्हटले.
कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने राज्य सरकारच्या तयारीबाबत उच्च न्यायालयात अनेक जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवर मंगळवारी सुनावणी होती. विम्बल्डनचा अंतिम सामना ही या वर्षाची लक्षवेधक घटना होती. तुम्ही या सामन्यात एक गोष्ट पहिली की नाही आम्हाला माहीत नाही; पण या स्टेडियममध्ये एकाही प्रेक्षकाने मास्क घातला नव्हता. स्टेडियम प्रेक्षकांनी गच्च भरले होते. एका महिलेशिवाय कोणीही मास्क घातले नव्हते. तिथे एक भारतीय क्रिकेटरही उपस्थित होता आणि त्यानेही मास्क घातला नव्हता, असे न्या. कुलकर्णी यांनी म्हटले.
आपल्या देशात अशी स्थिती कधी येणार? यासाठी प्रत्येकाचे लसीकरण करणे, हीच चावी आहे. काही राज्यांत कोरोनाची तिसरी लाट आली आहे. उत्तर पूर्वेकडील राज्यांत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रवेश झाला आहे. आपल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आखल्या पाहिजेत, असे न्यायालयाने म्हटले. आता आपण बऱ्याच आरामदायी स्थितीमध्ये आहोत. परंतु, आपल्याला ‘सुरक्षा कवच’ काढता कामा नये. राज्यातही डेल्टा प्लसचे रुग्ण आढळल्याचे वृत्त आम्ही वाचले आहे. या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने आवश्यक त्या उपाययोजना आखाव्यात, असे म्हणत न्यायालयाने या याचिकांवरील सुनावणी तीन आठवड्यांनी ठेवली.