NCP चे कार्यकर्ते नेमके कोणाच्या पाठीशी?; मुंबईत शरद पवारांना मानणारा कार्यकर्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 12:01 PM2023-07-12T12:01:03+5:302023-07-12T12:01:22+5:30

पक्षात दोन गट झाल्यानंतर मुंबईतील काही पदाधिकारी अजित पवार गटात सामील झाले आहेत.

With Sharad Pawar or Ajit Pawar? A story of NCP workers in Mumbai | NCP चे कार्यकर्ते नेमके कोणाच्या पाठीशी?; मुंबईत शरद पवारांना मानणारा कार्यकर्ता

NCP चे कार्यकर्ते नेमके कोणाच्या पाठीशी?; मुंबईत शरद पवारांना मानणारा कार्यकर्ता

googlenewsNext

मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेत ३ जुलै रोजी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुंबईतील पक्षाचे राजकीय समीकरण बदलले आहे. मात्र, आजही मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे नेतृत्व मानणारा पक्षाचा कार्यकर्ता आणि माजी नगरसेवक असल्याचे चित्र आहे. भविष्यात काय होईल, हे सांगता येत नाही. तसे बघता मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची तशी ताकद नाही. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत दोन्ही गटांना आपले अस्तित्व टिकवण्यासाठी आणि नगरसेवकांचे संख्याबळ वाढविण्यासाठी कंबर कसावी लागणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

पक्षात दोन गट झाल्यानंतर मुंबईतील काही पदाधिकारी अजित पवार गटात सामील झाले आहेत. मुंबईमध्ये त्याचा परिणाम होईल असे वाटत नाही. शरद पवार हे आमचे आदर्श आहेत. मुंबई शहरामध्ये आजही त्यांच्या बरोबर आमच्यासारखे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत जे निःस्वार्थपणे पक्षाचे काम करतात. मुंबईत पक्षाचे काम करताना त्यांचा चेहरा व नाव वापरून संघटना पुढे नेली पाहिजे. त्यांच्या विचारधारणेमुळे आम्ही त्यांच्या सोबत असून त्यांचे विचार आम्ही समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम करत राहू. त्यामुळे २०२४ ला शरद पवार यांच्या मागे नक्कीच मुंबईचे नागरिक खंबीरपणे उभे राहून अजित पवार यांच्या गटाला जागा नक्कीच दाखवेल. - अजित रावराणे, जिल्हाध्यक्ष, उत्तर पश्चिम

राष्ट्रवादीचा खराखुरा कार्यकर्ता व मच्छीमार समाज आजही शरद पवार यांच्या बरोबर आहे. २०१३ मध्ये मच्छीमारांच्या बोटीसाठी डिझेलची वर्गवारी घाऊक खरेदीदार अशा प्रकारात केल्यामुळे मच्छीमारांना लागणाऱ्या डिझेलच्या किमती आकाशाला भिडल्या. डिझेल खरेदी करून मासेमारी व्यवसाय करणे केवळ अशक्य होते. त्यावेळी शरद पवार हे केंद्रात कृषिमंत्री होते. त्यांनी तातडीने त्यावेळचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेऊन एका दिवसामध्ये मच्छीमारांच्या डिझेलची भाववाढ रद्द केली. व्हॅट पद्धत सुरु झाल्यावर राज्य सरकारकडून मच्छीमारांना डिझेल विक्रीकर परतावा मिळावा यासंदर्भातही ते नेहमी मच्छीमारांच्या बाजूने उभे राहिले. • प्रदीप टपके, माजी अध्यक्ष, राष्ट्रवादी मच्छीमार सेल

महाविकास आघाडीचे काय होणार? महाविकास आघाडीवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. शरद पवार यांच्याबाबत आजही नागरिकांच्या मनात आस्था आहे. त्यामुळे कालपर्यंत आमच्या बरोबर विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजावणाऱ्यांनी सतेच्या लालसेपोटी सत्ताधारी गटात प्रवेश केल्याचे महाराष्ट्रातील नागरिकांना पटलेले नाही. महाविकास आघाडी आजही भक्कम आहे. त्याची प्रचीती आगामी येणाऱ्या निवडणुकांमध्ये दिसेल. - सुनील प्रभू, आमदार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे

Web Title: With Sharad Pawar or Ajit Pawar? A story of NCP workers in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.