अजित पवारांच्या भाषणावेळी सभागृहात देवेंद्र फडणवीस-जयंत पाटलांमध्ये खडाजंगी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 06:28 PM2022-08-23T18:28:14+5:302022-08-23T18:40:17+5:30
विधानसभेत शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिल्यानंतर त्यावर बोलण्यासाठी अजित पवार उभे राहिले.
मुंबई - विधिमंडळ पावसाळी अधिवेशन सुरु आहे. त्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. मंगळवारी विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार भाषण करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्यात खडाजंगी झाली. त्यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी माईक हाती घेऊन सभागृहातील सर्वच सदस्यांना विनंती केली त्यानंतर हा वाद मिटला.
विधानसभेत शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिल्यानंतर त्यावर बोलण्यासाठी अजित पवार उभे राहिले. त्यावेळी अजित पवार म्हणाले की, खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या तमाम शेतकऱ्यांचे लक्ष अधिवेशनाकडे लागलं होतं. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात सतत पाऊस पडतोय. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. दोन्ही बाजूच्या सदस्यांनी पहिल्या आठवड्यात याबाबत चर्चा सुरू केली. राजकारणात काम करताना श्रद्धा सबुरी हा महत्त्वाचा गुण असतो. परंतु मुख्यमंत्री चर्चेला उत्तर देताना म्हणाले विरोधी पक्षाचे आरोप सहन करण्यापलीकडचे आहेत. सहन करण्याला मर्यादा असतात. विरोधकांच्या चिठ्ठ्या आहेत असं सांगत इशारा दिला. ते सातारचे सुपुत्र आहेत. मुख्यमंत्री विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उत्तर देताना बाहेर सातारच्या एका शेतकऱ्याने जाळून घेतले. तो अर्धवट जळाला, त्याच्यावर दवाखान्यात उपचार सुरू आहेत ही वाईट गोष्ट आहे असं म्हटलं.
त्यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी भाषण थांबवत माझ्याकडे आलेल्या माहितीनुसार संबंधित शेतकरी हा उस्मानाबादचा होता असं म्हटलं. त्यावेळी पाँईट ऑफ ऑर्डर उपस्थित करत राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेते बोलताना त्यांचे भाषण झाल्यानंतर तुम्ही सभागृहाला माहिती देऊ शकत होता. अध्यक्ष सत्तारुढ पक्षाचं काम करतायेत का अशी शंका येते. अध्यक्षांनी सत्तारुढ पक्षाचं काम करू नये हीच अपेक्षा आहे असं सांगितले. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत कुणी कधी बोलायचं हा अधिकार अध्यक्षांचा असतो. अध्यक्षांनी कधी बोलायचं हे सांगण्याचा अधिकार कुणाला नाही. भाषण करताना कधी टोकायचं हा अधिकार अध्यक्षांचा आहे. जयंत पाटील यांनी अध्यक्षांवर हेतू आरोप केला. ते पटलावरून काढलं पाहिजे अशी मागणी केली.
तेव्हा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, विधिमंडळाचं अधिवेशन सुरु आहे. विधानभवनाच्या आवारात एखादी घटना घडली त्याबाबत माहिती अध्यक्षांकडे येते. विरोधी पक्षनेते एखादी माहितीचा उल्लेख करत असतील त्याची माहिती माझ्याकडेही आली होती. रेकॉर्डवर चुकीचं जाऊ नये यासाठी मी बोललो याचा अर्थ एखाद्या पक्षाची बाजू मांडली असा होत नाही. सभागृहात माझा मान राखणं न राखणं ही वेगळी गोष्ट आहे परंतु या पदाचा सन्मान सर्व सदस्यांनी राखावा असं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं. त्यानंतर हा वाद मिटला आणि अजित पवारांनी पुन्हा भाषणाला सुरुवात केली.