'तुम्ही महाराष्ट्रात राहताय, आता हिंदी-उर्दू अन् इंग्रजी शाळेतही मराठी कम्पल्सरी'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 08:53 PM2020-01-10T20:53:14+5:302020-01-10T20:54:07+5:30
मी, मंत्रिमंडळात लवकरच एक विषय आणणार आहे. महाराष्ट्रात ज्या ज्या शाळा असतील
मुंबई - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठी भाषेसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. राज्यातील सर्वच शाळांमध्ये मराठी सक्तिची करणार असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची गेल्या बऱ्याच दिवसांपासूनची मागणी अजित पवार पूर्ण करणार असल्याचं दिसून येतंय. कारण, लवकरच राज्यातील सर्वच शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा होणार असल्याचे संकेत पवार यांनी दिले आहेत.
राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच बारामतीत दाखल झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी भव्य नागरी सत्काराचे आयोजन केले होते. त्याशिवाय बारामती शहरातून अजित पवार यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या भव्य मिरवणुकीनंतर अजित पवारांनी सत्काराला उत्तर देणारं भाषण केलं. त्यावेळी, मराठी भाषेबद्दल अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
मी, मंत्रिमंडळात लवकरच एक विषय आणणार आहे. महाराष्ट्रात ज्या ज्या शाळा असतील, ज्या उर्द असतील, इंग्रजी असतील, हिंदी असतील, मराठी असतील. ज्या भाषेतील असतील त्या भाषेतल्या, तिथं पहिलीपासून दहावीपर्यंत मराठी कम्पल्सरी करणार, असे अजित पवार यांनी म्हटले.
तुम्ही महाराष्ट्रात राहताय, माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येक मुला-मुलीला मराठी लिहता, वाचता अन् बोलता आलं पाहिजे. एकदा का मराठी आलं की हिंदीही लिहिता वाचता बोलता येईल, असेही पवार यांनी सांगितले. अजित पवारांची मराठीबद्दलची मनसे भूमिका नक्कीच स्वागतार्ह आहे. सध्या, मराठी माध्यमांमध्येच मराठी विषय सक्तीचा आहे. मात्र, या निर्णयामुळे उर्दु, हिंदी अन् इंग्रजी शाळांमध्येही मराठी विषय सक्तीचा होईल.