Abhijit Katke: १८ वर्षांची मेहनत, सातत्य, कुस्तीतला मोठा पराभव अन् मग 'हिंद केसरी'चा खिताब By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 11:34 AM 2023-01-09T11:34:19+5:30 2023-01-09T11:55:11+5:30
हैदराबाद येथे झालेल्या भारतीय कुस्तीतील सर्वात मानाच्या हिंदकेसरी 2022 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी पार पडला. पुण्याच्या अभिजीत कटके याने हरयाणाच्या पैलवानाला अस्मान दाखवून यंदाचा हिंदकेसरी होण्याचा मान पटकावला. हैदराबाद येथे झालेल्या भारतीय कुस्तीतील सर्वात मानाच्या हिंदकेसरी 2022 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी पार पडला. पुण्याच्या अभिजीत कटके याने हरयाणाच्या पैलवानाला अस्मान दाखवून यंदाचा हिंदकेसरी होण्याचा मान पटकावला.
फायनलच्या सामन्यात अभिजीतने एकतर्फी वर्चस्व राखले आणि हरयाणाच्या सोमविर याला 5-0 अशा गुणांनी पराभूत करत हिंद केसरीच्या खिताबावर नाव कोरले.
अभिजीतच्या विजयानंतर महाराष्ट्राच्या लाल मातीत एकच जल्लोष पाहायला मिळाला. गल्लीपासून कोल्हापूरच्या आखाड्यापर्यंत सर्वांनी अभिजीतच्या हिंद केसरी होण्याचं अभिनंदन आणि कौतुक केलं.
हिंदी केसरीचा खिताब पटकावल्यानंतर अभिजीतने माध्यमांशी बोलताना आपला प्रवासच थोडक्यात उलगडला. गेल्या १७ ते १८ वर्षांची मेहनत, कुस्तीतील सातत्य आणि हिंद केसरी स्पर्धेचा एक पराभव आपल्यासोबत होता.
या मेहनतीच्या व अनुभवाच्या जोरावरच आणि कुटुंबीयांसह वस्तादांनी माझ्यासाठी घेतलेल्या परिश्रमामुळेच अखेर आपण हिंद केसरीचा खिताब पटकावला आहे, असे अभिजीतने माध्यमांशी बोलताना म्हटले.
हिंदी केसरी बनायचं किंवा एखाद्या स्पर्धेत उतरताना प्रत्येकजण खिताब जिंकायचा हेच ध्येय घेऊन येत असतो. मीही तेच ध्येय घेऊन यंदा हैदराबादला आलो होतो, अखेर खिताब जिंकल्याचा आनंद माझ्यासह सर्वांनाच आहे.
आता हैदराबादला आलोय तर बिर्याणी खाऊनच जाणार आहे. हैदराबादही फिरायचं आहे. मात्र, कुस्तीत येण्यापूर्वी पाहिलेलं हिंद केसरीचं स्वप्न आता पूर्ण झालं असून आता देशासाठी मेडल जिंकायचं स्वप्नही त्याने बोलून दाखवलं.
दरम्यान, अखिल भारतीय ॲमेच्युअर रेसलिंग फेडरेशन यांच्यावतीने आयोजित या स्पर्धेत देशभरातील शेकडो पैलवानांनी सहभाग घेतला होता. खरं तर चार दिवस सुरू असलेल्या या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत महाराष्ट्राचे दोन मल्ल दाखल झाले होते.
फायनलच्या सामन्यात महाराष्ट्राच्याच पैलवानांमध्ये लढत होईल अशी अपेक्षा होती, मात्र हरयाणाच्या सोमविरने या आशेवर पाणी टाकले आणि अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. पहिल्या उपांत्य फेरीत ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना अटीतटीच्या लढतीत हरयाणाच्या सोमविर याच्याकडून पराभव पत्करावा लागला होता.
दरम्यान, दुसऱ्या उपांत्य फेरीत कटके याला पुढे चाल मिळाल्याने त्याने फायनलचे तिकिट मिळवले. फायनलच्या सामन्यात अभिजीतने एकतर्फी खेळ दाखवला आणि 5-0 ने मोठा विजय मिळवला. त्याने शक्ती आणि युक्तीचा बरोबर वापर करून हरयाणाच्या पैलवानाला चितपट केले.